गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात दोन सत्रांच्या कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ग्रंथालयाच्या दैनंदिन कामकाजातील होणारे बदल, माहिती तंत्रज्ञानविषयक नवीन घडामोडी, संगणकीकरण, दैनंदिन ताण-तणाव या सर्व बाबींना ग्रंथालयातील कर्मचारी सामोरे जात असताना याविषयातील तज्ज्ञ व्यक्तींकडून अधिक माहिती आणि मार्गदर्शन प्राप्त व्हावे या प्रमुख उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक प्र. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले.
पहिल्या सत्रात खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. नंदकिशोर मोतेवार यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ग्रंथालयाचे संगणकीकरण करताना येणारे विविध टप्पे, लागणारी माहिती, खर्च इ. विषयांवर माहिती दिली. याखेरीज ग्रंथालय व्यवस्थापन करतांना येणारे अनुभव यांविषयीही चर्चा केली. दैनंदिन कामकाज करत असताना येणारे विविध प्रकारचे ताण-तणाव याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे समर्पक दिली.
दुसऱ्या सत्रात डी.बी.जे. महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. सुधीर मोरे यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. ग्रंथालय व्यवस्थापन, कामकाज, दैनंदिन काम करत असताना निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याविषयी सविस्तर चर्चा केली आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रकारच्या शंकांचे त्यांनी निरसन केले.