महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, विचारवंत महात्माज्योतिबा फुले यांना जयंती दिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे होत्या. आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या, महात्मा फुले भारतातील थोर समाज सुधारक होते. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी भारतातील स्त्री शिक्षणाचा पाया घालण्याचे मोलाचे कार्य केले, आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या शिक्षणासाठी खर्च करून स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले.
‘शेतकऱ्यांचे आसूड’ आणि ‘गुलामगिरी’ हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ असून, तत्कालीन समाजातील अनिष्ट प्रथा, परंपराविरुद्ध महात्मा फुले यांनी आपल्या साहित्यकृतीतून आवाज उठवला. तत्कालीन समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. समाजात समता, न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचे आचार-विचार, चारित्र्य आणि चरित्र संपूर्ण समाजाला प्रेरणादायी, बोध घेण्यासारखे आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.
महात्मा फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन हिंदी विभागाचे प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले. याप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. चिंतामणी दामले, पर्यावेक्षिका प्रा. अस्मिता कुलकर्णी, विविध विभागप्रमुख, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते.