रत्नागिरी : गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात ‘शाश्वत भविष्यासाठी महिला सक्षमीकरण’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व महिला विकास कक्ष आणि श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २ मार्च, २०२४ रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.२० या वेळेत ही परिषद संपन्न होणार असून, या परिषदेचे उद्घाटन कौटुंबिक न्यायालय, ठाणे येथील न्यायाधीश नेत्रा अजय कंक यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला र. ए. सोसायटीच्या पदाधिकारी आणि रत्नागिरीतील सुप्रतिष्ठीत वकील ॲड. प्राची जोशी उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत ॲड. संध्या सुखटणकर, डॉ. स्वाती गाडगीळ, श्रीमती सीमा यादव या साधनव्यक्ती म्हणून मार्गदर्शन करणार असून, देशभरातून संशोधक मान्यवर आपल्या शोधनिबंधाचे सादरीकरण करणार आहेत. विविध क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्त्रीशिक्षण, महिलांचे आरोग्य, लिंगविषयक संवेदना, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांचे योगदान, महिला सक्षमीकरणाबाबत भारतीय आणि जागतिक दृष्टीकोन, महिलांसाठीचे कायदेशीर हक्क आणि सामाजिक न्याय, महिला आणि प्रसारमध्यमे, महिलांसाठी भविष्यातील कल आणि शाश्वत संधी अशा विविध विषयांवर परिषदेत विचारमंथन होणार आहे. या राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनाकरिता गोगटे – जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲड. डॉ. आशिष बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. डॉ. सोनाली कदम, विधी महाविद्यालयाच्या प्रा. संयोगिता सासणे आणि अन्य आयोजक सदस्य प्रयत्नशील आहेत.
ही परिषद ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरुपात होणार असून, या परिषदेत होणाऱ्या विचारमंथनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि प्राचार्य ॲड. डॉ. आशिष बर्वे यांनी केले आहे.