व्यक्तीला आपला व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी हक्कांची नितांत गरज असते. व्यक्तीला जन्मत: मिळालेले हक्क म्हणजे मानवी हक्क होय. समाजातमानवी हक्कविषयक जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील यांनी येथे व्यक्त केले. मानवी हक्क दिनानिमित्त गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय (स्वायत्त) आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने दि. १० डिसेंबर १९४८ रोजी मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा प्रसिद्ध केला. तेव्हापासून जगभरात दरवर्षी १० डिसेंबर हा दिवस ‘मानवी हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात प्रा. निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. पाटील यांनी मानवी हक्क दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमी, मानवी हक्कांची उत्क्रांती आणि विकास, मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा, मानवी हक्कांची होणारी पायमल्ली, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे कला शाखा विभागप्रमुख प्रा. वैभव कानिटकर यांनी विद्यार्थ्यांना मानवी हक्क दिनाचे महत्त्व सांगून, समाजातजीवन जगत असताना आपण सर्वांनी आपल्या मानवी हक्कांविषयी जागृत राहून वाटचाल केली पाहिजे. आपल्या हक्कांचा उपभोग घेत असताना इतरांच्या हक्कांना बाधा येणार नाही असे वर्तन केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील शास्त्र शाखा विभागप्रमुख प्रा. दिलीपकुमार शिंगाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कार्यक्रम समिती प्रमुख प्रा. विस्मया कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, शिक्षक कर्मचारी यांचे सहकार्य तर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.





Visitors Online : 4