गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २७ फेब्रुवारी रोजी राधाबाई शेट्ये सभागृहात मराठी राजभाषा दिन संपन्न झाला. प्रथम वर्ष कला शाखेतील भाषिक कौशल्याच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख डॉ.शिवराज गोपाळे यांनी मराठी विभाग सातत्याने विद्यार्थांच्या अंगी असलेल्या कलागुणांना नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे प्रतिपादन केले. विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अभंग, ओवी, कथा वाचन, मालवणी बोलीतील नाटिका, कविता अभिवाचन सादर केले. याच दिनाचे औचित्य साधून भाषिक कौशल्याच्या विद्यार्थ्यांनी ‘माझं गाव’ ही संकल्पना घेवून तयार केलेल्या पुस्तकाचे कला शाखेच्या उपप्राचार्य प्रो.डॉ.चित्रा गोस्वामी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मराठमोळी संस्कृती जपली जावी, ती लोकांपर्यंत पोहचावी या हेतूने विद्यार्थ्यांकरिता मराठमोळ्या खाद्यपदार्थ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनुक्रमे प्रथम क्रमांक अक्षता चव्हाण, द्वितीय क्रमांक शायना पाटील, तर तृतीय क्रमांक विभागून संपदा महाबळ व सूर्याणी प्रजापती यांना देण्यात आला. या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रा. दत्तात्रय वालावलकर व संगीता रेवाळे यांनी काम पहिले.
मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगतात, “ मराठी भाषा समृद्ध आहे. तिचे जतन व संवर्धन अशाच कार्यक्रमांच्या माध्यमातून होत असते.” असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. चित्रा गोस्वामी यांनी केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर यांनी शुभेच्छा देवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा खाडिलकर व दिप्ती गद्रे या विद्यार्थिनींनी केले. संतोषी गिरी या विद्यार्थिनीने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.