gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे ‘मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन’ संपन्न

गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन सोहळा दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाङ्ममय मंडळ प्रमुख डॉ. शिवराज गोपाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी वाङ्मय मंडळ विविध विद्यार्थीकेंद्री उपक्रम राबविते याची माहिती दिली. यानंतर संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी अभ्यागतांचा परिचय करून दिला. ‘लिपी- उद्गम आणि विकास’या विषयावर डॉ. निर्मला कुलकर्णी, पुणे यांचे व्याख्यान पीपीटी सादरीकरण करत सादर झाले. सादरीकरणात त्यांनी अर्माईट, ग्रीक, खरोष्ठी, ब्राह्मी, नागरी- देवनागरी आदी लिपींचा मागोवा घेऊन त्याचे उपप्रकार आणि नमुने स्लाईडद्वारे दाखविले. लिपींच्या अस्तित्वाची गरज कशी निर्माण झाली ते सांगून ताडपत्र, भूर्जपत्र, चर्मपत्र यावर कसे लिहिले जाऊ लागले, याची माहिती दिली. तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करताना जागतिक पातळीवरच्या लिपींचा अभ्यास असेल तर व्यावसायिक संधी तुमच्या पायाशी चालत येते, हेआवर्जून नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी भाषा अभ्यासकांनी विविध लिपी शिकणे कसे आवश्यक आहे आणि त्यातून होणारे लाभ याचा उहापोह केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा शिवलकर यांनी केले तर आभार डॉ. निधी पटवर्धन यांनी मानले. हिंदी, उर्दू, इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयाचे आणि भाषाप्रेमी प्राध्यापक व विद्यार्थीया कार्यक्रमास उपस्थित होते.

Comments are closed.