gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन विद्यार्थी उपक्रमाने संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या(स्वायत्त) मराठीवाङ्मय मंडळाचे उद्घाटन विद्यार्थी उपक्रमाने संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन उपक्रमाने दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी संपन्न झाले. महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला.महाविद्यालयाचे मराठीवाङ्मय मंडळ विविध साहित्यिक उपक्रम नेहमी आयोजित करीत असते. प्रख्यात साहित्यिक आणण्याऐवजी विद्यार्थ्यांमधील वाङ्मयीन क्षमता पुढे यावी याकरता हा प्रयोगशील उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात मराठीवाङ्मय मंडळाचे समन्वयक डॉ. शिवराज गोपाळे यांनी मराठी वाङमय मंडळांतर्गत होणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. मराठीवाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील शैक्षणिक वर्षात कोणते साहित्यिक उपक्रम होऊ शकतात याविषयी माहिती दिली.

प्रथम वर्ष कला शाखेतील भाषिक कौशल्याच्या विद्यार्थ्यांनी मराठीवाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या उद्घाटन प्रसंगी प्रकृती पूजनाचे भिलोरी भाषेतील गीत ,देवमोगरा मातेचे गीत, कविता अभिवाचन, मराठमोळा फॅशन शो, लावणी नृत्य, कीर्तन, पोवाडा असे विविध कार्यक्रम सादर झाले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या ‘भाषिक कौशल्य’ या विषयामुळे नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्यविषयी जाण वाढीस लागून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला कला शाखेच्या उपप्राचार्या र्य डॉ. चित्रा गोस्वामी यांनी शुभेच्छा दिल्या.

मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ या भारतीय भाषांमधून सादरीकरण करून भाषिक वैविध्य आणि समृद्धी अधोरेखित करण्याचा सुंदर प्रयत्न प्रस्तुत कार्यक्रमामधून करण्यात आला. विविध रंगांनी सजलेल्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी डॉ. निधी पटवर्धन यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले .

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी ओंकार आठवले याने केले. या कार्यक्रमाच्या वेळी विविध विषयांचे विभाग प्रमुख, मराठी विभागातील सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.