gogate-college-autonomous-updated-logo

कोरोना काळातील राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान उल्लेखनीय- नाम. उदय सामंत

राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचा कोविड-१९च्या संक्रमण काळात केलेल्या सेवा कार्याची दाखल घेऊन त्यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून सत्कार समारंभ आणि ‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ नाम. उदयजी सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून कोकणातील प्रथितयश अशा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ६ सप्टेंबर २०२१ रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यामधून खरे-ढेरे महाविद्यालय, गुहागर येथील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक कु. प्रथमेश श्रीपाद परांजपे याने विलगीकरण कक्षात केलेली सेवा जीवनावश्यक वस्तूंचे केलेले वाटप, मास्क्ची निर्मिती, आरोग्य मित्र, अंत्यसंस्कारासाठी मदत, चक्रीवादळातील काम, रक्तदान, चिपळूण येथील पूर परिस्थिती स्वयंसेवक म्हणून केलेल्या योगदानाची दखल घेतली गेली आणि त्याला कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅ. नाथ पै कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. आरती नाईक हिने इतरांसाठी जगण्याची जाणीव ठेऊन कोरोना महामारीच्या काळात स्वत:ला झोकून देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. मास्क वाटप, अन्नधान्य वाटप, पथनाट्य माध्यमातून केलेल्या जनजागृतीची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि त्यांनाही कोविड योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले. गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी कोविड संक्रमण काळात घ्यावयाच्या दक्षतेविषयी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, दापोली, संगमेश्वर, चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यातील ३० ठिकाणी पथनाट्य सदर करून जागृती केल्याबद्दल स्वयंसेवकांना मान. मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पथनाट्य सादरीकरणासाठी या विद्यार्थ्यांना कार्य्क्रमाधाकारी डॉ. सोनाली कदम, प्रा. शिवाजी उकरंडे आणि डॉ. दानिश गनी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे औचित्य साधून चिपळूण महापुरात सेवा कार्य केलेल्या खरे-ढेरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधाकारी प्रा. युवराज पाटील यांनाही गौरविण्यात आले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या रसायनशास्त्रातील दोन संदर्भ ग्रंथांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सत्कार समारंभप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान. उदायजी सामंत यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कोविड-१९ महामारीच्या काळात केलेल्या योगदानाचा आढावा घेतला. आरोग्य, महसूल यासारख्या विभागातील व्यक्ती बरोबर राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी आपत्ती काळात केलेले योगदान उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाविद्यायीन तरुणांनी केलेल्या सेवा कार्याची दाखल घेणे, त्यांचा गौरव करणे हे मी कर्तव्य समजतो, अशा कृतज्ञापूर्वक भावना मंत्री महोदयांनी व्यक्त केल्या. सेवाभावी वृत्ती आपल्या कृतीतून दाखविणाऱ्या तरुण स्वयंसेवकांच्या बळावर आपण आपत्तींना सामोरे जाऊ शकतो असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

कोविड योद्धा सत्कार समारंभात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संपर्क अधिकारी डॉ. प्रभाकर देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकात या कार्यक्रमाची प्रासंगिकता अधोरेखित केली. पर्यावरणाच्या प्रश्नांना सामोरे जाताना, त्यामधील राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान स्पष्ट करताना राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार सिमितीचे सदस्य श्री. अंकित प्रभू यांनी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विषयक कृती कार्यक्रमावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा मान. शिल्पाताई पटवर्धन होत्या. राष्ट्राच्या घडणीतील शिक्षण आणि संस्काराची गरज त्यांनी अधोरेखित केली. याप्रसंगी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री. सुधीर पुराणिक आणि रत्नागिरी जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे आणि खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय, गुहागर व बॅ. नाथ पै कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, कुडाळ या महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते. शेवटी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. सोनाली कदम यांनी मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले तर कार्यक्रमाधिकारी प्रा. शिवाजी उकरंडे यांनी सूत्रसंचालन केले.

Comments are closed.