gogate-college-autonomous-updated-logo

रत्नागिरीच्या भविष्यकालीन सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी र. ए. सोसायटीने पुढाकार घ्यावा – माजी आमदार बाळासाहेब माने

रत्नागिरीच्या भविष्यकालीन सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी र. ए. सोसायटीने पुढाकार घ्यावा - माजी आमदार बाळासाहेब माने

र. ए. संस्थेने प्रदेशाच्या गरजा ओळखून रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टी ठेवूनएक शैक्षणिक आराखडा तयार करावा, जेणेकरून इथल्या युवकांना उच्च शिक्षणासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. तसेच सद्यस्थितीमध्ये उद्योगप्रधान-व्यावसायिक शिक्षण देण्याची आवश्यकता असून, र. ए. सोसायटीने त्यासाठी पुढाकार घेऊन कोकणच्या विकासासाठी विद्यार्थांसाठी उद्योगप्रधान अभ्यासक्रम राबवावे, असे मत माजी आमदार बाळासाहेब माने यांनी येथे व्यक्त केले. र. ए. सोसायटीचे संस्थापक कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार बाळासाहेब माने उपस्थित होते.

आपले मनोगत व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्य समर्पित वृत्तीचे असून, कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या संस्थेची स्थापना करून कोकणात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.भविष्यात शिक्षणाबरोबरच आरोग्य, उद्योग, युवकांचे कौशल्य विकसन या क्षेत्रात काम करण्याची गरज असल्याचे ते पुढे म्हणाले. आपल्या मनोगतात त्यांनीसंस्थेचीकार्यशैली, संघभावनेबद्दल कौतुकास्पद भाष्य केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतात संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी र. ए. सोसायटीच्या स्थापनेपासूनचा संस्थेने आजपर्यंत केलेल्या प्रगतीचा आलेख उपस्थितांसमोर मांडला.

त्यानंतर कार्यवाह श्री. सतीश शेवडे यांनी संस्थेच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची उद्घोषणा केली. त्यातकै. बाबुराव जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी (प्रभारी प्राचार्य, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय), कै. मालतीबाई जोशी आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार श्री. रवींद्र कीर (र. ए. संस्था कार्यालय), कै. मालतीबाई जोशी आदर्श सेवकपुरस्कार सौ. सानिका कुर्ते (ल.ग.प.प्राथमिक विद्यामंदिर) यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त सत्कारमूर्ती प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी प्रातिनिधिक स्वरुपातआपले मनोगत व्यक्त करून संस्थेप्रति कृतज्ञताव्यक्त केली. याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री. माने यांच्या हस्ते संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांचा संस्थेला विविध माध्यमातून सुमारे १५ कोटी रुपयांची देणगी प्राप्त करून दिल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. विलास पाटणे म्हणाले, माणसे निरलसपणे किती त्याग करू शकता याचे जिवंत उदाहरण म्हणजे कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी. त्यांचेही संस्था आणि आपणा सर्वांवर प्रचंड ऋण आहे. समाजाचा प्रचंड विरोध असतानादेखील त्यांनी या संस्थेची स्थापना करून प्रतिकूल परिस्थितीत ही संस्था वाढवली. संस्थाचालक जेव्हा संस्थेकरिता वाहून घेतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने संस्था उभी राहते. समाजाच्या जडणघडणीत शिक्षक मोलाची भूमिका बजावतो; परंतु दुर्दैवाने आज त्याला समाजात प्रतिष्ठा, उचित मान-सन्मान मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात रोवलेल्या या बीजाचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. यासंस्थेची कीर्ती जगभरात पसरली असून, संस्थेचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरतआहेत. ते अजूनही संस्थेशी जोडलेले आहेत. संस्थेला वेगवेगळ्या देणग्या प्राप्त झाल्या या सर्वांचे श्रेय आपणा सर्वांचे असून, आगामी काळात रत्नागिरीच्या विकासासाठी एक शैक्षणिक आराखडा तयार केला जाईल, अशीग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.

याप्रसंगी व्यासपीठावर र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, उपाध्यक्ष ॲड. विलास पाटणे, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मकरंद साखळकर, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णीआदि मान्यवर उपस्थित होते.विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे युटूबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. यासाठी डॉ. विवेक भिडे, प्रा. चेतन मालशे, प्रा. प्रतिक शितूत, प्रा. रूपेश ताम्हणकर यांचे तांत्रिक सहाय्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश नाईक यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मकरंद साखळकर यांनी केले. या कार्यक्रमात र. ए. सोसायटीचे सर्व पदाधिकारी, नियामक आणि विश्वस्त मंडळाचे सदस्य, गोगटे-जोगळेकर वरिष्ठ आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक-अध्यापक वर्ग, र. ए.सोसायटीच्या सर्व घटकशाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी र. ए. सोसायटीचे पदाधिकारी, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांचे मार्गदर्शन, तर प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, श्री. विजयकुमार काकतकर, सेवक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed.