gogate-college-autonomous-updated-logo

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्वज्ञान कालातीत’- ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्वज्ञान कालातीत’- ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे

सखोल अभ्यास, चिंतन, त्या आधारे आखलेली नीति आणि केलेली कृती हीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचे गमक असून, त्यांचे तत्वज्ञान कालातीत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे यांनी येथे केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विविध विभागांच्यावतीने विशेष व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात येते. समाजशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख स्व. संजय जोशी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सामाजिक शास्त्र मंडळाच्यावतीने दरवर्षी विशेष व्याख्यानाचे आयोजन केले जाते. आतापर्यंतया व्याख्यानमालेला प्रमुख वक्ते म्हणून विविध प्रसिद्ध विचारवंतांची उपस्थिती लाभली आहे. विद्यमान वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक, मराठ्यांच्या इतिहासाचे सखोल अभ्यासक आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव श्री. पांडुरंग बलकवडे यांचे ‘लोककल्याणकारी शिवराय आणि त्यांची राजनीति’ या विषयावरविशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवप्रतिमेचे पूजन आणि द्वीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सामाजिक शास्त्र मंडळाचे समन्वयक डॉ. शिवाजी उकरंडे यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून प्रा. संजय जोशी यांच्या आठवणीना उजाळा देऊन या व्याख्यानमालेची माहिती विशद केली. प्रा. पंकज घाटे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला.

उपस्थितांसमोर आपले विचार मांडताना श्री. बलकवडे पुढे म्हणाले, ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श कल्याणकारी राज्य निर्माण करून अन्याय-अत्याचारांपासून समाजमुक्त करण्याचा प्रयत्न केला. स्वराज्य स्थापनेची पार्शभूमी विशद करून छत्रपतीशिवरायांच्या राजनीतिविषयक कार्याचा पाया घालण्याचे कार्य त्यांचे वडील शहाजी राजे यांनी केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुण्याच्या भूमीत जिजाबाईंनी शिवरायांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून ती भूमी पवित्र केली, ही जगातील एकमेव घटना आहे. नीतिविषयक प्राचीन भारतीय ग्रंथ, शस्त्रविद्या, दुर्गशास्त्र, न्यायविद्या इ.ची शिकवण देऊन त्यांनी एक आदर्श राजा घडवला. शहाजीराजांच्या राज्याचे स्वराज्यात रुपांतर केले. कृषिक्रांती, अर्थक्रांती, सामाजिक क्रांती, राष्ट्रक्रांती, लष्करक्रांती आणि त्यातून घडून आलेली सांस्कृतिक क्रांती अशा क्रांत्याद्वारे स्वराज्याचा पाया घालून एक आदर्श राज्य त्यांनीनिर्माण केले. भावी पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन सशक्त, भ्रष्टाचारमुक्त आदर्श समाज निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. आपल्याव्याख्यानातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचेप्रशासन, कररचना, युद्धनीती, लोकनीती, त्यांचे देशाला असलेले योगदान अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्तकरताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले, एक आदर्श राजा आणि प्रजा कशी असावी, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे स्वराज्य होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत त्यांची आई जिजाबाई यांचेयोगदान फार मोठे आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान प्रणाली या विषयांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य या विषयाचा समावेश केल्यास त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे ते पुढे म्हणाले.

याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. शिवाजी उकरंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी कु. मनस्वी नाटेकर हिने तर आभारप्रदर्शन प्रा. निलेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता सामाजिक शास्त्र मंडळ सदस्य, कार्यालयीन कर्मचारी, सेवक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed.