र. ए. सोसायटीच्या गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील मुख्य लिपिक श्री. प्रसाद गवाणकर यांचा सेवानिवृत्तीपर सदिच्छा समारंभ महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला.
श्री. प्रसाद गवाणकर २४ जुलै १९९२ रोजी महाविद्यालयात लिपिक म्हणून रुजू झाले. आपल्या ३१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचेविशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सलग दोन वेळा त्यांची नेमणूक झाली. महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचा सन २०११ साठीचा ‘गुणवंत कर्मचारी पुरस्कार’; मुंबई विद्यापीठाचा सन २०१६-१७ चा ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार’; गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचा आदर्श कर्मचारी पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
आपल्या सेवानिवृत्तीपर शुभेच्छा समारंभाच्या सत्काराला उत्तर देताना श्री. गवाणकर म्हणाले, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील एक नामवंत शिक्षणसंस्था असून, विद्यार्थीदशेपासूनच माझा या संस्थेशी संबंध आला. त्यामुळे तेव्हापासूनच माझे या संस्थेशी ऋणानुबंध जुळलेले आहेत. माजी कार्याध्यक्ष स्व. अरुअप्पा जोशी यांचे याक्षणी विनम्रपणे स्मरण करणे मला क्रमप्राप्त आहे; असे ते म्हणाले. या संस्थेने मला सेवेची संधी दिली त्याबद्दल मी संस्था आणि महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. या महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडूनही मला खूप आदर, प्रेम मिळाले, या सर्वांच्या सहकार्यामुळे मी काम करू शकलो. या सर्व प्रवासात माझी सहधर्मचारिणी सौ. प्रिया गवाणकर हिने आणि माझ्या कुटुंबीयांनीही मला मोलाची साथ दिली. भविष्यात संस्था आणि महाविद्यालयाच्या वाटचालीत माझे निश्चितच योगदान राहील, असे सांगून त्यांनी महाविद्यालयाला भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री. प्रसाद गवाणकर यांचे प्रगल्भ वाचन, दांडगा जनसंपर्क, कोणतेही काम मेहनतीने तडीस नेण्याची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अन्य पैलू होय. रत्नागिरी शहरात आणि महाविद्यालयात ते ‘बापू’ या नावानेच परिचित आहे. महाविद्यालयात कार्यालयीन सेवा बजावताना आपली साहित्यविषयक अभिरुचीही त्यांनी जोपासली. चांगल्या पुस्तकांच्या वाचनासोबतच लेखनही केले. त्यांच्या भंडारी बोलीभाषेतील लेखनाला विविध आस्थापना, संस्था यांचे पुरस्कार मिळाले आहेत. उत्तम व्यवस्थापक, कुशल संघटक म्हणूनही ते परिचित आहेत.
याप्रसंगी र. ए. सोसायटीच्यावतीने कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, संस्थेचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे यांच्या हस्ते तर महाविद्यालयाच्यावतीने प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते, महाविद्यालयातीलबुक्टू युनिट आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय शिक्षक- शिक्षकेतर पतसंस्थेच्यावतीने श्री. प्रसाद गवाणकरयांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात माजी आमदार श्री. बाळासाहेब माने, र. ए, संस्थेचे सचिव श्री. सतीशजी शेवडे, अॅड. भाऊ शेट्ये, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, श्री. महेश सरदेसाई, रत्नागिरी नगरपरिषदेतील कर्मचारी श्री. जितेंद्र विचारे यांनी आपली मनोगते व्यक्त करून बापूंच्यागतआठवणीना उजाळा दिला आणि भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी सुरुवातीच्या काळातील आठवणी सांगून बापू गवाणकर यांच्या स्वभावातील विशेष गुणांचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, संस्था आणि महाविद्यालयाच्या कामानिमित्त मी बापुंसोबत जिथे जिथे गेले तेव्हा माझ्या पाठीमागे बापू धाकट्या भावासारखा उभा राहिला. संस्थेच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्यावर बापूने संस्थेला मोलाची साथ दिली. असे सांगून त्यांनी श्री. गवाणकर यांचा स्वभाव, कार्यातील गुणवैशिष्ट्ये अधोरेखित केली.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार श्री. बाळासाहेब माने, र. ए, संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन सचिव श्री. सतीशजी शेवडे, अॅड. भाऊ शेट्ये, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, सत्कारमूर्ती श्री. प्रसाद गवाणकर, सौ. प्रिया गवाणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तिन्ही शाखेच्या उपप्राचार्या, विविध ठिकाणाहून आलेला बापूंचा मित्रपरिवार, कुटुंबीय आदींसह वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तुप्ती धामणस्कर यांनी केले.