gogate-college-autonomous-updated-logo

‘हृदय परिवर्तन केवळ गुरुमुळे शक्य’- श्री. वझे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात व्याख्यान संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कल्याण समितीतर्फे कोविड-१९ आपत्तीमुळे बदललेल्या शैक्षणिक वातावरणात गुरु शिष्य नातेसंबंधांचे बदललेले आयाम लक्षात घेऊन शिक्षकांनी अधिक कार्यक्षम होण्याच्या दृष्टीने व कोविड कालखंडातील अडचणींवर मात करून सकारात्मक उर्जा प्राप्त करण्याच्या हेतूने गुरु शिष्य संवादाच्या नव्या दिशा याविषयी श्री. चंद्रशेखर वझे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी गुरु-शिष्य परंपरेचा अर्थ सांगताना शिक्षक या शब्दाचे अनेक अर्थ सांगितले. कला क्षेत्रात आजही जोपासल्या गेलेल्या गुरु शिष्य परंपरेची अनेक उदाहरणे आपल्या ओघवत्या शैलीत दिली. जगभरात विविध देशांमध्ये शिक्षक, प्राध्यापक यांना असलेला दर्जा, सामाजिक स्थान व त्या पाठीमागे असणारी गुरु या व्यक्तिमत्वाची श्रेष्ठता स्पष्ट केली. छोट्या बोधकथांमधून शिक्षक या सामाजिक घटकाची जबाबदारी, विद्यार्थ्यांचे हृदय परिवर्तनाची शक्ती, विद्यार्थ्यांना कार्यप्रवृत्त करण्याची जबाबदारी, निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करण्याचे कार्य, अहंकार विरहीत शिक्षणाची आवश्यकता, शिक्षकी पेशाची सामाजिक पालकत्वाची जबाबदारी आणि शिक्षकांची आत्मपरीक्षणाची गरज त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत मांडली.

महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी कर्मचारी कल्याण समतीतर्फे आयोजित केलेल्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. समिती सदस्य डॉ. सोनाली कदम, डॉ. दिनेश माश्रणकर यांनी संयोजनात सहभाग घेतला. सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. सीमा कदम यांनी केले. समितीच्या समन्वयक डॉ. निधी पटवर्धन यांनी आभारप्रदर्शन करताना कर्मचारी कल्याण समितीच्या विविध उपक्रमांची माहिती देत कर्मचारी कल्याणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आवाहन केले. कोविड कालखंडातील सर्व शासकीय नियम आणि सुरक्षा नियमांचे पालन करून सदर व्याख्यानाचा प्राध्यापकांनी आस्वाद घेतला.

Comments are closed.