नुकत्याच देवरुख येथे संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात दक्षिण रत्नागिरी झोनमध्ये १८ महाविद्यालये सहभागी झाली होती. सदर महोत्सवात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपदाचा मान पटकवला आहे. महाविद्यालयाने ५४ गुणांची कमाई करत नाट्य विभागातील आपली मक्तेदारी कायम ठेवत ५ पदके प्राप्त करत नाट्य विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच संगीत विभागात उत्तम कामगिरी करत विविध प्रकारांमध्ये वर्चस्व ठेवत मुंबई येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेकरिता मजल मारली आहे.
यापूर्वी महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे कार्यशाळा आणि मल्हार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले; यामुळे नवीन आणि ज्येष्ठ विद्यार्थी यांच्यात समन्वय झाला. त्यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून युवा महोत्सवाची तयारी सुरु झाली. वादविवाद स्पर्धेत हृषीकेश जोशी आणि अनिकेत कांगणे, सुरवाद्य वरद सोहनी, गायन वैष्णवी जोशी, सुगम गायन ईशानी पाटणकर, मिमिक्री शैलेश इंगळे यांना स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्यांना मूकाभिनय दिग्दर्शक मयूर साळवी, स्किटकरीता विनोद जाधव आणि मयूर भाटकर, एकांकिका दिग्दर्शक मनोज भिसे, कार्टुनिगसाठी सुशांत केतकर, हिंदी एकपात्री स्मितल चव्हाण, दिग्दर्शक ओंकार बंडबे, मेंदी स्पर्धेत मिसबा काझी, वक्तृत्व स्पर्धेत ऐश्वर्या आचार्य यांनी सुयश संपादन केले. सांस्कृतिक विभागातर्फे महाविद्यालयीन प्राध्यापक, अनेक माजी विद्यार्थी यांनी उत्तम सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, डॉ. राजीव सप्रे, डॉ. मकरंद साखळकर आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आनंद आंबेकर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.