गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीचा रसायनशास्त्र विभाग आणि सायन्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन’ नुकताच संपन्न झाला. भारतीय रसायनशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्या १६५व्या जयंतीला केंद्रस्थानी धरून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी आचार्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या विशेष दिनाचे औचित्य साधून सायन्स असोसिएशनच्या वार्षिक उपक्रमांचेही उद्घाटन करण्यात आले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या आणि रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अपर्णा कुलकर्णी, माजी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख आणि इंडियन कौन्सिल ऑफ केमिस्टचे सदस्य डॉ. मिलिंद गोरे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच या विशेष कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. प्रथमेश साठे हे प्रमुक व्याख्याते म्हणून लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्या जीवनकार्याचा आढावा पॉवरपॉइंटच्या सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांना विषद केला. प्रा. निशा केळकर यांनी सायन्स असोसिएशनच्या वार्षिक उपक्रमांचा आढावा सदर केला.
प्रमुख वक्ते श्री. साठे यांनी ‘कृषी क्षेत्रामध्ये रसायनशास्त्राचे महत्व’ या विषयावर सखोल, अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यान दिले. आचार्यांच्या शिकवणीला केंद्रस्थानी मानून आत्ताच्या पिढीने ‘शेती उत्तम, व्यापार दुय्यम आणि नोकरी कनिष्ठ असे पूर्वीचे चित्र पुन्हा आणण्याची गरज आहे’ असे विषद केले. तसेच शेतीमध्ये असलेल्या विविध संधींची माहिती दिली. शेतीमध्ये सुशिक्षित विद्यार्थ्यांची गरज आहे, असेही ते म्हणाले. तसेच शेतीची संशोधनाशी सांगड घालून समाजाला त्याचा कसा उपयोग होऊ शकेल हे स्वत:च्या उदाहरणावरून दाखवून दिले.
डॉ. मिलिंद गोरे यांनी इंडियन कौन्सिल ऑफ केमिस्टच्यावतीने सदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले.
या कार्यक्रमाला विज्ञान शाखेतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. मेघना म्हादये यांनी केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.







Visitors Online : 2