गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रुव्ह सेल, मॅग्रुव्ह सोसायटी ऑफ इंडिया व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ व १८ मार्च २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘कोस्टल वेटलॅड ऑफ इंडिया’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचा उद्घाटन समारंभ महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात नुकताच संपन्न झाला.
परिषदेचा प्रारंभ ‘जैवविविधता’ या विषयावरील छायाचित्रण प्रदर्शनाने झाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी डॉ. अरविंद उंटावले, डॉ. हुकुम सिंग, डॉ. विनोद धारगळकर, डॉ. प्रदीप मुकादम, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर इ. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले.
याप्रसंगी मॅग्रुव्ह सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यकारी सचिव डॉ. अरविंद उंटावले यांनी उपस्थितांना ‘मॅग्रुव्ह व त्यांचे पर्यावरणीय महत्व’ विषद केले. त्याचप्रमाणे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाशी संलग्न विविध संस्था आणि इतर महाविद्यालये यांनी मॅग्रुव्हचे संवर्धन आणि विकासासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी रत्नागिरीतील ‘अविष्कार’ या संस्थेतील विद्यार्थ्यांचे त्यांच्या पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी विशेष कौतुक केले आणि या विद्यार्थ्यांनादेखील मॅग्रुव्ह संवर्धन आणि विकास उपक्रमात सहभागी करून घेण्याचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मस्त्य महाविद्यालय, शिरगाव येथील अधिष्ठाता डॉ. हुकुम सिंग यांनीदेखील मॅग्रुव्ह वनस्पतीचे पर्यावरणीय बदलांतील महत्व आणि किनारी पाणथळ जागांची उपयोगिता सोप्या भाषेत उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिली.
महाविद्यालयात संपन्न होणाऱ्या या दोन दिवसीय परिषदेत पाणथळ परीसंस्थांचे महत्व, संवर्धन व विकास, मत्स्य व्यवस्थापन, पाणथळ जगांतील लुप्त पावत चाललेल्या प्रजातींचे पुनर्निर्माण तंत्र इ. विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच या निमित्ताने जैवविविधता या विषयावर भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेच्या उद्घाटन सोहोळ्याचा समारोप श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थी आणि नागरिक यांनी पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या विविध उपक्रमांकरिता पुढे येऊन सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमप्रसंगी चौगुले महाविद्यालय, गोवा, सोमय्या महाविद्यालय, मुंबई, मस्त्य महाविद्यालय, शिरगाव, लांजा महाविद्यालय आणि महाविद्यालयाशी सलग्न असलेल्या एन.आय.ओ., गोवा, बी.एन.एच.एस., मुंबई इ. संस्थांचे विद्यार्थी आणि प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरती पोटफोडे यांनी केले.