रत्नागिरी : भारतीय इतिहास अनुसंधान संशोधन परिषद (ICHR) च्या वतीने स्वा. सावरकर यांच्यावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात नुकतीच संपन्न झाली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संपूर्ण भारतभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. या महोत्सवाअंतर्गत भारतीय इतिहास अनुसंधान परिषद (ICHR), नवी दिल्लीच्या वतीने स्वा. सावरकर यांच्यावरील ‘Dismantling Casteism : Lessons from Savarkar’s : ‘Essentials of Hindutva’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात करण्यात आले होते. स्वा. वि. दा. सावरकर रत्नागिरीत वास्तव्यास असताना त्यांनी जातीव्यवस्थेच्या निर्मुलनासाठी उल्लेखनीय आणि ऐतिहासिक असे सामाजिक – राजकीय कार्य केले, अस्पृश्यता समाजातून नाहीसी व्हावी म्हणून पतितपावन मंदिरात सर्व जातीबांधवांना सोबत घेऊन सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून समाजात जनजागृती घडवून आणली. स्वा. सावरकरांचे रत्नागिरीतील कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचावे या हेतूने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या प्रारंभी आय.सी.एच.आर. चे सर्व सदस्य आणि परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांनी पतितपावन मंदिरात जाऊन स्वा. सावरकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले. स्वा. सावरकरांच्या विचारांचे अनुसरण करून भारतातील जातीव्यवस्थेचे समूळ उच्चाटण होणे हे राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी केले.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत स्वा. सावरकर यांच्या जातीव्यवस्थेसंदर्भातील विचार आणि कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या विविध मान्यवरांच्या सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुरु घासीदास विश्वविदयालयाचे कुलगुरू प्रा. अशोक मोडक, महात्मा गांधी आंतरक्षेत्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. रजनीश शुक्ला, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे अध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, आय.सी.एच.आर.चे सदस्य सचिव प्रा. कुमार रत्नम, प्रा. हिमांशू चतुर्वेदी, डॉ. नीरज श्याम देव, श्री. अक्षय जोग, श्री. अभिनव प्रकाश, डॉ. बाल मुकुंद पांडे, डॉ. राजीव लोचन, डॉ. आर. एच. कांबळे यांनी ‘The Idea of Hinu Dharma’, ‘Efflorescence of Hindutva’, ‘Caste, Colonialism and Orthodoxy’, अशा विविध विषयांवर ऑनलाईन-ऑफलाईन माध्यमातून सावरकरांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार आणि कार्यावर आपल्या विचारातून प्रकाश टाकला. या परिषदेचे समन्वयक म्हणून जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. उमेश अशोक कदम यांनी काम पाहिले. रत्नागिरी तसेच देशातील सावरकर प्रेमींना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा म्हणून या परिषदेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.
ब्रिटिशांनी स्वा. सावरकरांना रत्नागिरीतील मध्यवर्ती कारागृहात एका अंधार कोठडीत स्थानबद्ध केले होते. या ऐतिहासिक वास्तूत स्वा. सावरकरांच्या वापरातील काही वस्तू जतन करण्यात आल्या आहे. या वास्तूत एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाने या परिषदेची सांगता झाली.
या परिषदेत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकर्ता श्री. मोहन भावे, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीश शेवडे आदी मान्यवरांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी आय. सी. एच. आर.चे सर्व सदस्य, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन तर जिल्हा पोलीस प्रशासन, रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाचे तुरुंग अधिकारी श्री. अमेय पोतदार, पतितपावन मंदिर संस्थेचे श्री. बाबा परूळेकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, माजी इतिहास प्रमुख डॉ.आर.एच.कांबळे, तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, श्री. प्रसाद गवाणकर, विविध प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ही परिषद गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात संपन्न झाली असल्याने हा क्षण संस्था, महाविद्यालयाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी परिषदेच्या समारोपाप्रसंगी यांनी व्यक्त केले.