गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे शास्त्र शाखेने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित अनेक उपक्रम राबविले. महाविदयालयातील एकूण १० शास्त्र विभागापैकी प्रत्येक विभागाने आपल्या विषयाबद्दल समाजात आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणि कुतूहल निर्माण करण्याचा उत्तम प्रयल केला. विज्ञान शाखेच्या सर्व प्रयोगशाळा दरवर्षीप्रमाणे आजही सर्व नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी खुल्या केल्या होत्या.
यामध्ये प्राणीशास्त्र विभागाने कॅन्सर, रंगांधळेपणा, इत्यादी आजाराविषयी माहिती दिली. जैवरसायन शास्त्र प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी मानवी मेंदूबद्दल मनोरंजक तथ्ये सांगून अभ्यागतांना आश्चर्यचकित केले आणि मज्जासंस्थेशी संबंधित अनेक प्रयोग सादर केले. सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी विविध सूक्ष्मजीव त्यांची कार्यपद्धती, माणसाला होणारे त्यांचे फायदे याविषयी छान सादरीकरण केले. जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेत, जैवप्लास्टिक, जैविक इथेनॉल यांची निर्मिती तसेच या विषयातील शास्त्रज्ञ व त्यांच्या कामाची माहिती दिली. वनस्पती शास्त्र विभागात वनस्पतीचे DNA, पेशीरचना याबद्दल माहिती आणि हर्बल सौदर्य प्रसाधने निर्मिती याबद्दल माहिती दिली.
गणित विभागाने भूमिती आणि गणितातील तत्वे गमतीदार कोडी आणि खेळ यांच्या साहाय्याने समजावून सांगितली.
रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विभागातील मुलांनी विविध प्रयोग शालेय मुलांना करून दाखवले आणि मूलभूत गोष्टी समजावून सांगितल्या. खगोल मंडळाने विदयार्थ्यांना दुर्बीणीतून सूर्यदर्शन घडविले. संगणक शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी डिजीलॉकर, बुलेट ट्रेन यांची मॉडेल्स बनवून त्यांचे कार्य, softwares, networking projects,गेम्स,इ. सादर केले.माहिती तंत्रज्ञान विभागाने सायबर सिक्युरिटी, calorimeter,रडार सिस्टीम, वेबसाईटस, इत्यादीची सादरीकरणे केली.
या सर्व प्रदर्शनांना शहरातील GGPS, पटवर्धन हायस्कूल, नाईक हायस्कूल,शिर्के हायस्कूल इत्यादी अनेक शाळांतील सुमारे 1000 विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयातील शास्त्र,वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी भेट दिली.
स्व.अरुआप्पा जोशी स्मृतिदिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयेजित विविध स्पर्धा चा बक्षीस वितरण कार्यक्रम राधाबाई शेट्ये सभागृह येथे संपन्न झाला. यासाठी उद्योजक श्री आनंद देसाई प्रमुख पाहुणे म्हणून तसेच प्राचार्य डॉ. साखळकर सर, उपप्राचार्य विज्ञान शाखा डॉ. अपर्णा कुलकर्णी मॅडम आणि रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ गोरे सर उपस्थित होते. या कार्यक्रमात विभागात विशेष कामगिरी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. प्रास्ताविक करताना कुलकर्णी मॅडम यांनी कै.अरुआप्पा जोशी यांच्याविषयी आठवणी सांगितल्या आणि आजच्या सर्व प्रदर्शनाचे आयोजन आपला विद्यार्थी मंडळ सचिव कुणाल कुमठेकरच्या नेतृत्वा खाली सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले अशी शाबासकी दिली. श्री आनंद देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना आपले महाविदयालयीन शैक्षणिक जीवन, व्यवसायात केलेली प्रगती आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे व्यवसायात झालेले चांगले बदल या विषयी सांगितल. अन्न तंत्रज्ञान, हवामान शास्त्र या सारख्या करियर क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी सांगितल्या. स्व. अरुअप्पांनी सतत काम करत रहावे हा संस्कार आपल्यावर त्याच्या वागण्यातून केला असे म्हटले. तसेच नीटनेटकेपणे काम करत रहा आणि कोकणातील आंबा आणि मासेमारी या प्रमुख उद्योगासाठी संशोधन करा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. प्राचार्य डॉ साखळकर सर यांनी सर्व विभागांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतूक केले, तसेच आपल्या स्वायत्त महाविदयालयात NEP मध्ये या प्रकारच्या उपक्रमांना credits देता येतील असे सांगितले. स्व. अरुअप्पांची महाविदयालयात संशोधन विषयक काम वाढावे अशी इच्छा होती ती आता पूर्ण होत आहे असे प्रतिपादन केले.
यानंतर आजच्या विभागीय प्रदर्शनांचे मूल्यांकन करण्यासाठी महाविद्यालयाने नेमलेल्या परीक्षक समितीच्या निर्णयानुसार बक्षिसे देण्यात आली. यात प्रथम क्रमांक संगणक शास्त्र विभाग,द्वितीय क्रमांक विभागून माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान विभाग, तृतीय क्रमांक रसायनशास्त्र विभाग आणि उत्तेजनार्थ पारितोषिक गणित विभागाला मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ऋजुता गोडबोले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा श्रावणी केतकर यांनी केले.