गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि पर्यावरण संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने पावसाळ्यात पठारावर आढळणाऱ्या विविध वनस्पती आणि रानफुले यांचे निरीक्षण करण्यासाठी नुकतेच ‘नेचर वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. नागरिक आणि महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी यांनी या उपक्रमात आपला उत्स्फूर्त सह्भाग दर्शविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष आणि कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी संस्थेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या पर्यावरणविषयक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली आणि या उपक्रमामध्ये सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पठारावरील विशीष्टयपूर्ण वनस्पती विश्वाविषयी आपण अधिक सजग असले पाहिजे तसेच त्यंचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रा. शरद आपटे यांनी पठारावरील अल्पकालीन वाढणाऱ्या विविध फुलझाडांची, औषधी वनस्पतींची, कंदमूळांची शास्त्रीय माहिती दिली. यावेळी अॅड. संध्या सुखटणकर, डॉ. राजीव सप्रे, पर्यावरण संस्थेचे सचिव डॉ. दिलीप सावंत, डॉ. दिलीप नागवेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
या निसर्ग सहलीसाठी खास पनवेलहून आलेले श्री. प्रशांत खोबरेकर आणि श्री. जगदीश जाधव यांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून अनेक वनस्पतींची आपल्याला नव्याने माहिती झाल्याचे सांगितले. तसेच या सहलीमध्ये श्री. यतीन दामले, सौ. अनघा दामले, श्री. मंदार भागवत, श्री. विशाल मगदूम, श्री. श्रीवल्लभ साठे हे माजी विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन, डॉ. सोनाली कदम, डॉ. अमित मिरगल, प्रा. ऋजुता गोडबोले यांनी सदर निसर्ग सहलीचे नेटके आयोजन केले.