गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या नेव्हल एनसीसी विभागाच्या छात्रासैनिकांनी शहरातील मांडवी समुद्र किनारा येथे निर्माल्य व्यवस्थापन मोहिमेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. पर्यावरण संस्था, रत्नागिरी यांनी राबविलेल्या या उपक्रमात महाविद्यालयाच्या नेव्हल एनसीसी विभागाचे २२ कॅडेट्स सहभागी झाले होते.
नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवानंतर दि. ५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या वेळी नागरिकांकडे असलेल्या निर्माल्याचे सुयोग्य व्यवस्थापन व्हावे, तो इतस्ततः फेकला जाऊ नये, पर्यायाने निर्माल्याचे पावित्र्य राखले जावे तसेच समुद्र किनारा स्वच्छ व सुंदर राहावा आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे याकरिता हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला. महाविद्यालयातर्फे पी.ओ. कॅडेट रविराज पावरी आणि एल.डी. पुजा मदाने यांच्या नेत्तृत्वाखाली सहभागी झालेल्या या कॅडेट्समध्ये कचरा व्यवस्थापन, पर्यावरण रक्षण व संवर्धन याबाबत जागृती निर्माण करण्याचे काम या उपक्रमाने केले. या अत्यंत कळीच्या मुद्द्यांबाबत सजग झालेल्या या कॅडेट्सनी समुद्र किना-यावर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि संघटितरित्या प्रत्यक्ष काम करून, विसर्जनासाठी जमलेल्या नागरिकांमध्येही पर्यावरण रक्षण, कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रबोधन केले.
याप्रसंगी रत्नागिरीचे नगराध्यक्ष मा. राहुल पंडित, पर्यावरण संस्था, रत्नागिरीचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर, एनसीसी, महाराष्ट्र नेव्हल युनिटचे पदाधिकारी लीडिंग सीमॅन अजित भोसले , गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या नेव्हल एनसीसी युनिटचे लेफ्टनंट अरुण यादव उपस्थित होते. डॉ. कद्रेकर यांनी, नागरिकांकडून प्राप्त झालेल्या निर्माल्याचे योग्य विभाजन करून, नगरपरिषदेच्या सहकार्याने भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रामध्ये खत निर्मितीकरिता हे निर्माल्य पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली.