गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून बी.पी.ए. (बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स) आणि बी.बी.ए. (बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनीस्ट्रेशन)हे दोन नवे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत.
र. ए. सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील आणि मुंबई विद्यापीठातील एक प्रतिष्ठीत आणि नामवंत महाविद्यालय असून, स्थापनेपासून आजपर्यंत अध्ययन, अध्यापन, संशोधन, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक अशा विविध अभ्यासानुवर्ती आणि अभ्यासेतर क्षेत्रात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. NAAC मूल्यांकनात महाविद्यालयाने सलग चार वेळा ‘अ’ श्रेणी प्राप्त केली असून, याचीच परिणीती म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग आणि मुंबई विद्यापीठाने दि. ३१ मे, २०२३ रोजी महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा बहाल केला आणि दि. १ जून, २०२३ पासून रत्नागिरी जिल्ह्यातील दुसरे स्वायत्त महाविद्यालय होण्याचा मान महाविद्यालयाला मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनीस्ट्रेश नहे दोन नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलाविश्वात महाविद्यालयाचे एक आगळेवेगळे स्थान आहे. सळसळत्या तरुणाईच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालय कायमच प्रयत्नशील असते. महाविद्यालयाच्या लौकिकाला साजेशा अशा ‘झेप’ सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. या महोत्सवाच्या माध्यमातून अनेक कलावंतांची सांस्कृतिक जडणघडण झालेली आहे. महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी कलावंत नाटक, चित्रपट, मालिका अशा अभिनयाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या अभिनयाने नाव कमावलेले आहे. कोकणातील विद्यार्थ्यांना नाटक, नृत्य,अभिनय, ललित कला या विविध कलाप्रकारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे, या हेतूने आगामी वर्षापासून बी.पी.ए. (बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स) हा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. सध्या हा अभ्यासक्रम केवळ मुंबई विद्यापीठात चालविला जातो. असा अभ्यासक्रम सुरु करणारे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बहुधा पहिले महाविद्यालय असावे.
महाविद्यालयात कला, वाणिज्य, शास्त्र या पारंपरिक विद्याशाखेतील अभ्यासक्रमांबरोबरच बी.एम.एस. (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज), बॅचलर ऑफ अकाउन्टिंग ॲन्ड फायनान्स, माहिती- तंत्रज्ञानशास्त्र, संगणकशास्त्र असे विविध व्यावसायिक अभ्यासक्रम चालविले जातात. आगामी वर्षापासून बी.बी.ए. अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरु केला जाणार असून, हा अभ्यासक्रम सुरु करणारे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील पहिले महाविद्यालय आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनपर सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाकडून प्रवेशपरीक्षेचे (सी.ई.टी.) आयोजन करण्यात येणार असून, परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जाणार आहे. या परीक्षेच्या प्रवेशपरीक्षेचे अर्ज भरण्याचा कालावधी दि. २१ मार्च, २०२४ ते दि. ११ एप्रिल, २०२४ असा आहे. सदर परीक्षा आणि अभ्यासक्रमासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवार, दि. २ एप्रिल, २०२४ रोजी महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सभागृहात सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी प्रवेशक्षमता प्रत्येकी ६० असून, प्रवेशाकरिता विद्यार्थी कला, विज्ञान, वाणिज्यशाखेतील १२वी परीक्षा उत्तीर्ण किंवा एम.सी.व्ही.सी, तंत्रशिक्षण पदविका (डिप्लोमा) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमांसंदर्भातील सर्व माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या gjcrtn.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेचबी. पी.ए. अभ्यासक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. आनंद आंबेकर (७०२०७३७४००) यांच्याशी तर, बी.बी.ए. अभ्यासक्रमासाठी प्रा.अश्विनी देवस्थळी (९४२११४१९७१), प्रा. स्वप्नील जोशी (९४०३३६१२००), प्रा. प्रविणा पिलणकर (९६७३०११९८५) यांच्याशी संपर्क साधावा.
गतवर्षी मिळालेला स्वायत्ततेचा दर्जा आणि नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून सुरु करण्यात येणाऱ्या या दोन्ही नवीन अभ्यासक्रमांचा लाभ कोकणातील अधिकाधिक विद्यार्थ्यानी घ्यावा, असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.