रत्नागिरी : गोगटे – जोगळेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि.२९ नोव्हेंबर रोजी नवमतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारताने लोकशाही शासनपध्दतीचा स्वीकार केला असून, १८ वर्षावरील सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मुक्त, खुल्या आणि निष्पक्ष निवडणुका या लोकशाहीचा आधार असतात. निवडणुकांच्या संचलनाची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. दरवर्षी आयोगामार्फत अद्ययावत मतदार यादी तयार केली जाते. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध वरिष्ठ महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेणाऱ्या तरुण व पात्र विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मतदारनोंदणी करता यावी या हेतूने नवमतदार नोंदणी अभियानाचे आयोजन निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि निवडणूक शाखा, तहसील कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि.२९ नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते १.०० या वेळेत तरुण आणि पात्र नवमतदार विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात नवमतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी पात्र विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणी अर्ज भरून घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रमाणात या अभियानात सहभागी होऊन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.