गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय विशेष निवासी शिबीर रत्नागिरीतील चांदेराई गावात २६ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर या कालावधीत संपन्न झाले. जीवन कौशल्य आधारित विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास, जल संवर्धन आणि जागृती, पर्यावरण जागृती,आरोग्य विषयक जागृती, ग्राम स्वच्छता, सामाजिक विकास, नेतृत्व विकास अशा विविधांगी उद्दिष्टांनी केंद्रित या निवासी शिबिराची सांगता ०२ डिसेंबर रोजी झाली.
सांगता समारोप व विद्यार्थाच्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण या समारंभात करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी यांनी स्वयं सेवकांची समाजाप्रती काम करण्याची वृत्ती कशी महत्वपूर्ण आहे हे सांगितले. आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळालेली सकारात्मकता आयुष्यभर आनंद मिळविण्याची प्रेरणा देतो आणि प्रत्येक कामाचा आनंद मिळविता येतो असे सांगून दुसरा काय करतो यापेक्षा आपण काय करतो हे कसे महत्वाचे आहे याविषयी त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना एक व्यापक क्षेत्र असून विद्यार्थांनी क्षमता विकासाची संधी घेतली पाहिजे याचेही त्यांनी मागदर्शन केले. कृतीशील समूह म्हणूनच राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडे पहिले जाते. विद्यार्थांच्या उत्साहाकडे पाहून शिबिराच्या यशस्वितेचे त्यांनी कौतुक केले.
या सांगता समारोप कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रशासकीय उप प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर , माजी सरपंच दादा दळी, व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. विविध गुणदर्शन आणि स्पर्धांचे पारितोषिक वितरण पुढील प्रमाणे झाले. लक्ष्य गीत स्पर्धा प्रथम क्रमाक रेनबो ग्रुप, समूह गीत स्पर्धा प्रथम क्रमांक कोयना ग्रुप, पथनाट्य प्रथम कोयना ग्रुप, वादविवाद स्पर्धा तनुजा कांबळे, उत्कृष्ट वक्ता मृदुला भागवत, संगीत खुर्ची विजेता ओमकार लाड,उत्कृष्ट श्रमदान मोदिन जमादार (स्वयंसेवक) व इशा वारसे (स्वयंसेविका),अष्टपैलू स्वयंसेवक वृग्वेद पाटील, अष्टपैलू स्वयंसेविका गिरीजा चितळे, सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक शंतनू पवार व स्वयंसेविका श्रावणी करंबेळकर,उत्कृष्ट रंगकर्मी भक्ती सुतार,उत्कृष्ट सजावट कोयना व अथांग ग्रुप,सर्वोत्कृष्ट गटशः सादरीकरण रेनबो ग्रुप, सांस्कृतिक सादरीकरण वर्षा श्रुष्टी ग्रुप,अहवाल लेखनासाठी जलामृत ग्रुप,उत्कृष्ट कमेंट रंभारंभा,आणि सर्वोत्कृष्ट ग्रुपचे पारितोषिक कोयना गटास प्राप्त झाले.सांगता समारोपाचे सूत्र संचालन प्रा.हर्षदा पटवर्धन यांनी केले, प्रास्ताविक डॉ.दानिश गनी यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. सचिन सनगरे यांनी केले.
सदर सांगत समारोप कार्यक्रमास ग्राम पंचायत सदस्य उस्मान काझी, उर्दू शाळा शिक्षक समीर सोलकर, जीजे ९५ स्नेहबंध ग्रुपचे डॉ. आनंद आंबेकर, कार्यक्रमाधिकारी प्रा. उमा जोशी आणि अनेक माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.