gogate-college-autonomous-updated-logo

स्वच्छता ही सेवा अंतर्गत गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विविध उपक्रम संपन्न राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उल्लेखनीय कार्य

स्वच्छ भारत मिशन, स्वच्छता ही सेवा हे अभियान दि. १७ सप्टेंबर ते दि. ०२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. यासाठी स्वभाव स्वच्छता , संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित करण्यात आली होती. भारत सरकार , पृथ्वी विज्ञान मंत्रालय , नवी दिल्ली , क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय , नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय सेवा योजना विभाग मुंबई विद्यापीठ अंतर्गत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी विविध प्रकारच्या स्वच्छता विषयक उपक्रमात भाग घेऊन स्वच्छता विषयक जाणीव जागृती , समुद्र किनारा स्वच्छता , स्वच्छता सर्वेक्षण , प्रभातफेरी अशा उपक्रमात सहभाग घेतला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार, कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे, प्रा. हर्षदा पटवर्धन, प्रा. उमा जोशी यांनी स्वच्छता विषयक उपक्रमाचे नियोजन केले. दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी विद्यापीठाकडून प्राप्त निर्देशानुसार विविध उपक्रमाची आखणी करण्यात आली. दि. २१ सप्टेंबर सागर किनारा स्वच्छता उपक्रम भाट्ये झरी विनायक परिसरात करण्यात आले ८२ स्वयंसेवक यात सहभागी झाले, सागरी सुरक्षा विभाग, मत्स्य महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या मार्फत समुद्र किनारा स्वच्छ करून कचरा संकलन करण्यात आले. गोगटे जोगळेकर महाविद्यालय ते भाट्ये समुद्र किनारा अशी स्वच्छता विषयक प्रभात फेरी व जागृती अभियान राबविण्यात आले.

दि. २२ सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा उपक्रम अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी मागदर्शन केले. सामाजिक, मानसिक स्वच्छतेची आवश्यकता किती गरजेचे व राष्ट्रीय सेवा योजना कोणत्या पद्धतीने उपयुक्त ठरते याचेही त्यांनी मार्गदर्शन केले. स्वयंसेवक म्हणून आपली भूमिका ओळखून कार्य केले गेले पाहिजे असे मत त्यांनी मांडले. विद्यार्थी दशेपासून ते प्राचार्य होण्यापर्यंतच्या अनेक कामात राष्ट्रीय सेवा योजनामधील कार्याचा अनुभव आपल्याला फायदेशीर ठरल्याचे मत त्यांनी मांडले. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्राचीन व पारंपारिक ज्ञानाचे पुनरुज्जीवनाचे उद्दिष्ट राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून पूर्ण करता येईल. आपण सदोदित चांगले वर्तन टिकवून ठेवले पाहिजे, आत्मविश्वास, कार्य तत्परता , कष्ट यांतूनच संधी निर्माण होते. स्वतःचे ध्येय निश्चित करून स्वयंसेवकांनी व्यावसाईक कौशल्ये प्राप्त केली पाहिजेत. सामुहिक स्वरूपाच्या कामातून आपण यशस्वी होऊ शकतो. अशा प्रकारचे मार्गदर्शन त्यांनी केले. स्वरूप भाटकर व आकाश मणचेकर या माजी स्वयंसेवकांनी आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागातील १३२ स्वयंसेवक या उपक्रमास उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत घेतल्या गेलेल्या घोषवाक्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले, स्वच्छता ही सेवा या उपक्रम अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण उपक्रम, स्वच्छता, देशभक्ती या विषयावर काव्य वाचन स्पर्धा घेण्यात आली. श्रेयस रसाळ, गायत्री नाटेकर, मालवी होरंबे , सायली बारगुडे, ओंकार आठवले यांनी यात सहभाग घेतला. प्रा. उमा जोशी, प्रा. सचिन सनगरे यांनी देखील काव्यवाचन केले. दि. २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यालय स्वच्छ करून व स्वामी विवेकानंद यांचे स्मरण करून उत्साहात साजरा करण्यात आला. विविध स्पर्धा या प्रसंगी घेण्यात आल्या यामध्ये, वक्तृत्व व रिल मेकिंग हे विशेष उपक्रम ठरले. स्वच्छता सर्वेक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ५६ स्वयंसेवकांनी यावेळी आपला सहभाग नोंदविला. दि २७ सप्टेंबर रोजी स्वच्छतेचे संस्कार या विषयावर समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे यांचे मागदर्शन झाले. उपस्थित स्वयंसेवकांनी स्वच्छतेची शपथ घेतली. २२ स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते. दि. २८ सप्टेंबर रोजी भाट्ये गावातील अंगणवाडी परिसर स्वच्छता करण्यात आली. सोबत सार्वजनिक रंगमंच, मंदिर व बहुउद्देशीय सभागृह परिसर स्वच्छ करण्यात आला. ६ स्वयंसेवक यात सहभागी झाले होते.

दि. ०१ ऑक्टोबर रोजी पोस्टर आणि लेख स्पर्धा आणि काव्य स्पर्धा संपन्न झाली यासाठी स्वच्छ भारत समर्थ भारत, स्वच्छता ही सेवा, सेवा आणि संस्कार आणि निबंध स्पर्धासाठी नशा मुक्ती, स्वच्छतेच्या सवयी, पर्यावरण संवर्धन असे विषय देण्यात आले होते. पोस्टर स्पर्धेत कु. आसिया ईरशाद अत्तरवाले, लेख स्पर्धा मध्ये कु. आसिया ईरशाद अत्तरवाले , कु. आदिती सुहास कुळ्ये आणि काव्य स्पर्धा मध्ये अनुक्रमे प्रथम : रिया संजय कुळ्ये द्वितीय : मालवी सुनील होरंबे , तृतीय : आसिया ईरशाद अत्तरवाले यांनी पारितोषिके प्राप्त केली. स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत १०१ घरांचे सर्वेक्षण स्वयंसेवाकांमार्फत करण्यात आले. सर्वेक्षण करताना ओळ कचरा व सुका कचरा यांचे व्यवस्थापन कसे करावे यांचे मागदर्शन करण्यात आले.

दि. ०२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त भाट्ये समुद्र किनारा स्वच्छता अभियान राबविण्यात आले, २८ स्वयंसेवक यात सहभागी होऊन सकाळी ८ ते १० या वेळात समुद्र किनारा स्वच्छता अभियानातून महात्मा गांधीना आदरांजली देण्यात आली. स्वच्छ आणि सुरक्षित सागरकिनारा, पर्यावरण रक्षण, जनजागृती, सर्वेक्षण, सामाजिक माध्यमातून प्रबोधन, एक पेड मा के नाम अशा विविध उपक्रमातून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी आपले योगदान दिले. यासाठी नियोजनात कला शाखा उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी यांनी सहभाग घेतला व आवश्यक सुरक्षिततेच्या सूचना दिल्या. कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे, प्रा. हर्षदा पटवर्धन, प्रा. उमा जोशी यांनी योग्य पद्धतीने उपक्रमांची आखणी केली. विद्यार्थी प्रतिनिधी दिव्या किर, ओंकार आठवले, श्रेयस रसाळ यांनी विशेष योगदान दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सर्व स्वयंसेवक व कार्यक्रमाधिकारी यांचे विशेष कौतुक केले.

Comments are closed.