डॉ. होमी भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे दि. १२ ते १५ फेब्रुवारी २०२० या कालावधित सोसायटी फॉर फ्री रॅडीकल रिसर्च, इंडिया या संस्थेने १७व्या वार्षिक सभेचे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या ‘मानवी आजार, त्यामद्धे असणारी ऑक्सिकारक तणावांची भूमिका आणि त्याचे व्यवस्थापन’ यावर जागतिक परिषदेमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रा. आरती पोटफोडे, प्रा. प्रचीती राउळ, प्रा. सागर साळवी आणि अमोल जोशी, रसिका लेले, प्रतीक्षा फुटक, गौरी गोखले, शिवानी पालकर आणि अंकिता साळवी हे पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
सदर परिषदेच्या सहभागासाठी मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. अनुराधा मुजुमदार यांनी सहकार्य केले. परिषदेच्या २२ सत्रांमध्ये ३ व्याख्याने, ७२ निमंत्रित व्याख्याने, २० सादरीकरणे, ११० भित्तीपत्रक सादरीकरणे या बाबी समाविष्ट होत्या. या परिषदेला भारतातील प्रतिष्ठीत संस्थेतील शास्त्रज्ञ, सायंटीफिक ऑफिसर, डॉक्टरेट आणि पोस्ट डॉक्टरेट विद्यार्थी तसेच परदेशातील मान्यवर संशोधन संस्थांचे प्रतिनिधी यांनी सादरीकरणात सहभाग घेतला.
या परिषदेत प्रामुख्याने कर्करोगात असणारा ऑक्सिकारक तणावाचा सहभाग आणि त्याच्या उच्चाटनासाठी नॅनो तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, रेण्वीय जीवशास्त्र, औषधनिर्मितीशास्त्र यांची भूमिका यावर विस्तृतपणे चर्चा झाली. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना ही सत्रे आणि चर्चा पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे.
या संशोधनपर परिषदेसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. चंदा बेर्डे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.