आय.आय.टी., मुंबई व ग्रामीण क्षेत्र पर्यायी विकास तंत्रज्ञान (सितारा) विभाग संचलित उन्नत महाराष्ट्र अभियान ‘आपले प्रश्न आपले विज्ञान’ या उपक्रमाच्या अनुषंगाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले संशोधन डी.बी.जे. महाविद्यालय, चिपळूण येथे झालेल्या कार्यशाळेत सादर केले. विद्यार्थी संशोधक व त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक यांना महाविद्यालयामार्फत गौरविण्यात आले.
‘आपल्या ज्ञानाचे वैज्ञानिक उपयोजन गरजेचे असून आपल्या सभोवतालच्या स्थानिक समस्यांना दृष्टीने पाहून त्यांचा अभ्यास व शक्य तेथे समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणे व यासाठी विद्यार्थी दशेपासून कार्यरत असले पाहिजे’, असे मत महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी मांडले. तीनही विद्याशाखांचे उपप्राचार्य शोधवेध, अविष्कार अशा संशोधन उपक्रमांसाठी प्रोत्साहित करत असतात. यातून विद्यार्थ्यांची संशोधनवृत्ती वृद्धींगत होण्यास मदत होते. आय.आय.टी., मुंबई व ग्रामीण क्षेत्र पर्यायी विकास तंत्रज्ञान (सितारा) विभाग यांनी दिलेल्या संधीमुळे विद्यार्थ्यांना स्थानिक प्रश्नांचा अभ्यास करता आला.
समाजशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी महिला बचत गटांचा अभ्यास केला. अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी रत्नागिरी शहरातील ऑटो रिक्षांचा एक केस स्टडी केला; विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी आंबा व काळीमिरी या स्थानिक उत्पादनांचा अभ्यास करून त्यासंबंधीत प्रश्नांवर आपले संशोधन सादर केले.
या संशोधनासाठी डॉ. अपर्णा कुलकर्णी, उपप्राचार्या, विज्ञान शाखा यांनी महाविद्यालय समन्वयक म्हणून कार्य केले. डॉ. मयूर देसाई, डॉ. सोनाली कदम, प्रा. ऋजुता गोडबोले, डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. सचिन सनगरे यांनी मार्गदर्शक म्हणून कार्य केले. समाजशास्त्र विभागातील स्वरूप जीरोळे, रोहित ठुकरूल; अर्थशास्त्र विभागातील पौर्णिमा साठे, शुभ्रराणी होरंबे; विज्ञान विभागातील विजयश्री नागले, विदिशा पवार यांनी आपले संशोधन या उपक्रमात सादर केले.