रत्नागिरी : र. ए. सोसायटीचे गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून महाविद्यालयांच्या सर्वांगीण प्रगती आणि सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जातात. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) या नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमांअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदानित महाविद्यालयांना सक्षमीकरणासाठी विशेष अनुदान दिले जाते. या उपक्रमात सहभागी होण्याची प्रक्रिया आणि त्या संदर्भात माहितीपर मार्गदर्शन मिळावे या हेतूने रायगड, रत्नागिरीआणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुदानित महाविद्यालयांतील प्राचार्य आणि प्राध्यापकांकरिता गोगटे – जोगळेकर महविद्यालयात मंगळवार,दि. २९ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न होणार असून,या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य शासनाचे रुसा समितीवरील वरिष्ठ मार्गदर्शक सल्लागार प्रा. डॉ. प्रमोद पाब्रेकर आणि प्रा. डॉ. अजित टिळवे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. तरी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुदानित महाविद्यालयांतील प्राचार्य आणि त्यांचा एक प्राध्यापक प्रतिनिधीयांनी उपस्थित राहून या मार्गदर्शनपर कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणी करिता महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी कळवले आहे.