गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे विद्यार्थ्यांकरीता दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी “पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन” ह्या विषयावरील स्पर्धेचे आयोजन केले गेले. ह्या प्रसंगी व्यासपीठावर विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. ए. एम. कुलकर्णी, गणित विभाग प्रमुख प्रा. दिवाकर करवंजे, स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक प्रा.आदिती जोशी व प्रा. प्रशांत लोंढे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत स्पर्धा समन्वयक प्रा. स्पृहा जोशी यांनी केले. विद्यार्थ्यांसाठी ज्या व्यवसाय संधी आहेत, त्या संबंधित कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे तसेच सध्याच्या डिजीटल शिक्षण पद्धतीत पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन हे अत्यंत महत्वाचे साधन आहे, असे मनोगत उद्घाटन प्रसंगी विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. ए. एम. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तसेच गणित विभागातील प्रा. प्रतिक शितुत यांनी पॉवरपॉईंट कसा करावा ह्या विषयावर घेतलेल्या सत्राचे विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांना पॉवरपॉईंटचे स्किल्स, स्टेजवरील वावरासाठी आत्मविश्वास मिळणे, संभाषण कौशल्ये येणे ह्या हेतूने ही स्पर्धा दरवर्षी भरवली जाते. तसेच ह्या स्पर्धेमधील प्रथम दोन क्रमांक राज्यस्तरीय पॉवरपॉईंट स्पर्धेसाठी निवडले जातात.
ह्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले प्रशांत लोंढेयांनी सहभागी विद्यार्थ्याना आत्मविश्वासाने सर्वांसमोर सादरीकरण करण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. आदिती जोशी यांनी त्यांच्या वेळच्या सदर स्पर्धेच्या आठवणी सांगितल्या व आपण हे करू शकतो हा मोठा आत्मविश्वास ह्या स्पर्धेमधून मिळतो हे आवर्जून सांगितले.सादरीकरण करताना वेग कसा असावा, गणिताच्या बेसिक कन्सेप्ट माहिती असाव्यात असेही मत व्यक्त केले.
ह्या स्पर्धेमध्ये एकूण १२ संघ मिळून २१ विद्यार्थ्यानी भाग घेतला होता. त्यातील कु.आकांक्षा पाध्ये व कु. अमिषा शिंदे, कु.साहिल काजरेकर व कु.मनीष धावडे आणि कु.शिवम कीर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळवले.
आपला विषय चांगल्या पद्धतीने मांडणे तसेच कोणत्याही कामात चिकाटीने प्रयत्न करत राहणे हे गरजेचे असते आणि अश्या स्पर्धांमुळे महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांना हे शिकणे शक्य आहे असे मत विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी समारोपाच्या कार्यक्रमात व्यक्त केले आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व गणित विभागाचे कौतुक केले. सहभागी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही स्पर्धा उत्तमरीत्या पार पडली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्पृहा जोशी यांनी केले. सरते शेवटी स्पर्धा समन्वयक प्रा. स्पृहा जोशी यांनी विज्ञान उपप्राचार्या, परीक्षक, गणित विभागप्रमुख व महाविद्यालयाचे आभार मानले.