दि. ०३ ते ०६ डिसेंबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या प्राचीन भारतीय लिपी परिचय वर्गाचे आयोजन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) संस्कृत विभागातर्फे करण्यात आले. या वर्गाचा उद्घाटन कार्यक्रम दि.०३ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी वर्गाच्या मार्गदर्शिका डॉ. विनया क्षीरसागर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कलाशाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी आणि संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या.
संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी मुख्यातिथींचा परिचय करून देताना हस्तलिखितांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांच्या मनात जागृत झालेली लिपी विषयक जिज्ञासा शमवण्याच्या हेतूने ह्या लिपी वर्गाचे आयोजन केल्याचे सांगितले. या लिपी वर्गासाठी पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये कोशशास्त्र विभागात सह संपादक म्हणून निवृत्त झालेल्या व उदयपूर येथील धरोहर येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. विनया क्षीरसागर मार्गदर्शक म्हणून लाभल्या.
डॉ. विनया क्षीरसागर यांनी उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना लिपी म्हणजे काय हे सांगून लिपीमध्ये झालेल्या बदलातून तयार झालेल्या अन्य लिपींविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर सरांनी लिपीवर्गाला शुभेच्छा देत अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ह्या लिपी वर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा शिवलकर यांनी केले. लिपी परिचय वर्गासाठी संस्कृतविभागातील तसेच कलाशाखेच्या अन्य विभागातील विद्यार्थ्यांनी आणि संस्कृत भाषाप्रेमींनीही उपस्थिती दर्शविली.