र. ए. सोसायटीच्या गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातीलमानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. बीना कळंबटे या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा सेवानिवृत्तीपर सदिच्छा समारंभ महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला.
प्रा. बीना कळंबटे या जुलै, १९९२ मध्ये महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागात प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. आपल्या सेवेच्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी महाविद्यालयाने सोपविलेल्या विविध जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडल्या. महाविद्यालयात अध्यापन करीत असतानाच त्यांनी विविध शासकीय समित्यांमध्ये अध्यक्ष, सदस्या, समुपदेशक म्हणून कार्य केले. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी केलेल्या विविध समाजपयोगी कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मानसशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करीत असताना त्यांनी ‘Basic Skills of Hypnosis’ या कौशल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश केला. असा अभ्यासक्रम सुरु करणारे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे बहुधामहाराष्ट्र राज्यातील पहिले महाविद्यालय असावे.
आपल्या सेवानिवृत्तीपर शुभेच्छा समारंभाच्या सत्काराला उत्तर देताना प्रा. कळंबटे म्हणाल्या, महाविद्यालयीन सेवेत रुजू झाल्यानंतर सेवाकाळात महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर चांगले सहकार्यात्मक संबंध निर्माण झाले आणि ते सेवानिवृत्तीपर्यंत कायम टिकून आहेत.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते प्रा. बीना कळंबटे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी आपली मनोगते व्यक्त करूनप्रा. कळंबटे यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव विशद केले आणि त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सुरुवातीच्या काळातील आठवणी सांगून प्रा. बीना कळंबटे यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या स्वभावातील विशेष गुणांचा उल्लेख केला. त्यांना चांगले आयुआरोग्य लाभावे, त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या अनुक्रमे डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. सीमा कदम आणि डॉ. अपर्णा कुलकर्णी यांच्यासह कार्यालयातील श्री. संजीव दांडेकर, श्री. महेश सरदेसाई, श्री. नंदकुमार गोळपकर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. निलेश पाटील यांनी केले.