समताधिष्ठित समाजनिर्मिती हाराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचार आणि कृतीचा पाया असल्याचे प्रतिपादन डॉ. तुळशीदास रोकडे यांनी येथे केले. समतावादी, लोककल्याणकारी लोकराजे, आरक्षणाचे जनकअसे विविध नामाभिधान प्राप्त असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित व्याखानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याया जयंती दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात समाजशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तुळशीदास रोकडे यांचे ‘छत्रपतीशाहू महाराजांची सामाजिक न्याय संकल्पना आणि समकालीन संदर्भ’ विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
आपले विचार मांडताना डॉ. रोकडेपुढे म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे बहुजनांसाठी शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये राखीव जागा अशा विविध क्षेत्रात बहुमोल कार्य करणारे सुधारणावादी, कर्ते समाज सुधारक होते. सामाजिक– आर्थिक लोकशाही निर्माण करणारा लोकराजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय. राजर्षी, लोकनेता अशी त्यांची ओळख महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशाला आहे. डॉ. रोकडे यांनी आपले विचार मांडताना सामाजिक न्यायाची संकल्पना आणि त्याची समकालीन प्रस्तुतता इ. वर भाष्य करून छत्रपती शाहू महाराज यांच्यासामाजिक विचार आणि कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले, शासनाच्या निर्देशानुसार २६ जून हा दिवस राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जयंतीदिन राज्यभरात ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो. जनतेकडून राजर्षी ही पदवी मिळविणारे छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टेराजे होते. कोल्हापूर संस्थानात शेतीच्या भरभराटीसाठी धरण कालव्यांचे महत्व ओळखून केलेले जल आणि मृदा संधारणाचे प्रयोग, उद्योग विस्तारासाठी केलेले प्रयत्न, सर्वधर्म समभावाच्या मूल्य आणि तत्त्वातून शिक्षण संस्था आणि वसतिगृहांची केलेली उभारणी, सामाजिक सुधारणा, अस्पृश्यता निर्मूलन असे मोलाचे कार्य शाहू महाराजांनी केले. म्हणूनच त्यांना लोकराजा, राजर्षी अशा विविध उपाध्या जनसामान्यांकडून मिळाल्या. विद्यार्थ्यानी त्यांचे आणि त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवून त्यांचे विचार अंगी बाळगले पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.
याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. तुळशीदास रोकडे, कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी आदि उपस्थित होते. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, विभाग प्रमुख, समारंभ समिती सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समारंभ समिती प्रमुख डॉ. शिवाजी उकरंडे यांनी केले.