gogate-college-autonomous-updated-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘राजभाषा मराठी गौरव दिन’ उत्साहात संपन्न

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘राजभाषा मराठी गौरव दिन’ उत्साहात संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘राजभाषा मराठी गौरव दिन’ विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा दि. २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘राजभाषा मराठी गौरव दिन’ म्हणून जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात प्रमुख पाहुणे चित्रपट आणि नाट्यदिग्दर्शक श्री. राजेंद्र बडे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शन उद्घाटन आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पुस्तक रसग्रहण व लेख यांचा समावेश असलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण संपन्न झाले. यावेळी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, इतिहास विभाग प्रमुख डॉ. रमेश कांबळे, मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे आणि ग्रंथपाल प्रा. किरण धांडोरे उपस्थित होते.

उपस्थितांशी संवाद साधताना श्री. राजेंद्र बडे म्हणाले, ‘मी विद्यार्थी दशेत केलेले वाचन मला नंतरच्या आयुष्यात खूप उपयोगी पडले. माझी आई शिक्षिका असल्याने विविध विषयांची अनेक पुस्तके मला घरी वाचायला मिळाली यामुळे माझे अनुभव विश्व समृद्ध झाले’. असे सांगून विद्यार्थ्यांनी आपले वाचन सातत्याने सुरु ठेवण्याचे आवाहन केले. तसेच पुढे बोलताना त्यांनी आजचे वैविध्यपूर्ण असे ग्रंथप्रदर्शन खूपच भावल्याचे आपल्या अभिप्रायामध्ये आवर्जून नमूद केले आणि भित्तीपत्रकासाठी लेखन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील लेखनासाठी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

उपस्थितांचे स्वागत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापक, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘राजभाषा मराठी गौरव दिन’ उत्साहात संपन्न
कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘राजभाषा मराठी गौरव दिन’ उत्साहात संपन्न
राजभाषा मराठी गौरव दिन
Comments are closed.