श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज प्रबोधिनी आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने द्वि-दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळ, पावस येथे करण्यात आले.
द्वि-दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोप प्रसंगी प्रबोधिनीचे मार्गदर्शक डॉ. प्रदीप उर्फ बाबामहाराज तराणेकर, प्रबोधिनीचे विश्वस्त नितीन देशपांडे आणि डॉ. श्वेता जेजुरकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे प्रतिनिधी श्री. हेमंत गोडबोले आणि या परिसंवादासाठी समन्वय साधणारे श्री. दिगंबर जोशी उपस्थित होते. परिसंवादाचे आयोजन श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या साहित्याचा आणि कार्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी केले गेले.
दि. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी उद्घाटन कार्यक्रमानंतर दि. १९ आणि दि. २० ऑक्टोबर असे दोन दिवस सकाळी ९.०० ते सांयकाळी ६.०० या कालावधीत पाच सत्रे आयोजित केली गेली. या सत्रांमध्ये अनुक्रमे डॉ. प्रदीप उर्फ बाबासाहेब तराणेकर, डॉ. श्वेता जेजुरकर, डॉ. पंकज जाजे, श्री. शरदमहाराज जोशी आणि डॉ. कल्पना आठल्ये यांनी सत्राध्यक्ष पद भूषविले. दोन्ही सत्रे मिळून ३२ शोधनिबंध सादर केले गेले. या सत्रांमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी आणि तीन प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले.
यानंतर दि. २०ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता समारोप कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी उपस्थित सर्वांना मोलाचे आणि समयोचित मार्गदर्शन केले. तसेच प्रबोधिनीच्या पुढील कार्यक्रमांना साहाय्याचे आश्वासन दिले. प्रबोधिनीचे विश्वस्त डॉ. प्रदीप उर्फ बाबासाहेब तराणेकर यांनी उपस्थित सर्व अभ्यासक व भक्तांचे कौतुक केले व पुढील वर्षी होणाऱ्या परिसंवादाचे सूतोवाच केले. श्री. दिगंबर जोशी यांनी आभार मानले. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजरचित घोरकष्टोद्धरणस्तोत्राच्या पठनाने कार्यक्रमाची सांगता झाली.