gogate-college-autonomous-updated-logo

रत्नदुर्ग किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची अभ्यासपूर्ण क्षेत्रभेट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे रत्नागिरी शहरानजीक असलेल्या रत्नदुर्ग किल्ला परिसराची अभ्यासपूर्ण क्षेत्रभेट उत्साहात पार पडली. इतिहास घडलेल्या ठिकाणांवर जाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी डॉ. सचिन जोशी (डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी रत्नदुर्ग किल्ल्याची भक्कम तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार, अन्य वास्तू तसेच किल्ल्यासाठी उभारलेली संरक्षणरचना प्रत्यक्ष पाहिली व त्याविषयी माहिती जाणून घेतली. मार्गदर्शक डॉ. सचिन जोशी यांनी किल्ल्यावरील संरक्षण व्यवस्था स्पष्ट करताना तटबंदीची व दरवाज्यांची रचना, बुरुजांची बांधणी, तोफा व तोफांचा मारा करण्याची पद्धत, तसेच शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केलेली वास्तुरचना यांचे सविस्तर विवेचन केले. किल्ल्यांशी संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांतील पुरावे, बखरींमधील उल्लेख आणि प्रत्यक्ष वास्तूंच्या निरीक्षणातून दुर्गरचनेची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविण्यात आली. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना शिवकालीन सागरी संरक्षण धोरण, कोकण किनारपट्टीचे सामरिक महत्त्व आणि दुर्गबांधणीमागील महाराजांची दूरदृष्टी यांचा सखोल परिचय झाला.

यावेळी विद्यार्थ्यांनी किल्ला परिसरात फेरफटका मारत विविध वास्तुरचनांचे बारकाईने निरीक्षण करत आढळणाऱ्या पुराव्यांच्या, माहितीच्या नोंदी घेतल्या. त्यानंतर झालेल्या सत्रात डॉ. सचिन जोशी यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विविध ऐतिहासिक साधनांतील संदर्भ, मोडी कागदपत्रांतील अस्सल पुरावे तसेच दख्खन प्रदेशातील दुर्गरचनेची वैशिष्ट्ये यांचा आधार देत सविस्तर व समर्पक उत्तरे दिली. क्षेत्रभेटीच्या शेवटी छत्रपती शिवरायांचा वारसा जतन करणे तसेच ऐतिहासिक स्थळांचे जतन-संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत डॉ. जोशी यांनी याकामी विद्यार्थ्यांना जागरूक नागरिक म्हणून पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

क्षेत्रभेटीच्या आयोजनाकरिता प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई तसेच सर्व शाखांचे उपप्राचार्य यांचे पाठबळ लाभले. या उपक्रमाचे नियोजन इतिहास विभाग प्रमुख डॉ. पंकज घाटे, प्रा. मधुरा चव्हाण, एन. एस. एस. उपक्रमाचे समन्वयक प्रा. सचिन सनगरे, प्रा. विनायक गावडे, प्रा. सोनाली कुरतडकर तसेच अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहासाचे शिक्षक प्रा. निनाद तेंडुलकर यांनी केले.

Comments are closed.