गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी आणि विलिंग्डन महाविद्यालय, सांगली यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. बापट, डॉ. जाधव तसेच डॉ. कुंभार उपस्थित होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी आणि महाविद्यालीन प्राध्यापक उपस्थित होते.
डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी विलिंग्डन महाविद्यालयाचे तसेच डॉ. राजीव सप्रे यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे विविध विभाग आणि उपक्रमांचे सादरीकरण केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे समन्वयक म्हणून डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी तसेच विलिंग्डन महाविद्यालयाचे समन्वयक म्हणून डॉ. बापट यांनी जबाबदारी स्वीकारली. विलिंग्डन हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मधील प्रथितयश महाविद्यालय आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना योग्य तऱ्हेने विकसित करण्यात मोठा सहभाग आहे. तर गोगटे जोगळेकर हे मुंबई विद्यापीठातील नामवंत महाविद्यालय असून विलिंग्डन महाविद्यालयाबरोबर विद्यार्थी विकास, संशोधन तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध प्रकल्पांवर भविष्यात एकत्रित काम करणार आहेत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले.
प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि डॉ. ताम्हनकर यांनी या सामंजस्य कराराची गरज आणि तसेच महाविद्यालयातील उपक्रम यांची योग्य सांगड घालून एकत्रितपणे विविध उपक्रम राबिविणे तसेच त्यात नाविन्यपूर्णता असणे सद्याच्या काळात आवश्यक आहे असे मत प्रदर्शित केले. महाविद्यालयातील विभाग तसेच उपक्रमास भेटी दिल्यानंतर प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर यांनी महाविद्यालयास शुभेच्छा व्यक्त केल्या.