gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘माध्यम क्षेत्रातील रोजगार संधी’ या विषयावर व्याख्यान संपन्न

एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील प्रथितयश निवेदिका ज्ञानदा कदम यांचे ‘माध्यम क्षेत्रातील रॊजगार संधी आणि कौशल्ये’ या विषयावरील व्याख्यान गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नुकतेच संपन्न झाले. या व्याख्यानाकरिता महाविद्यालयातील पत्रकारिता, मास कम्युनिकेशन अशा उपयोजित अभ्यासक्रमांचे विद्यार्थी आणि या क्षेत्रात काम करू इच्छिणारे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रा. वासुदेव आठल्ये यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. माजी विद्यार्थिनी सौ. स्वाती राणे यांनी ज्ञानदा कदम यांचा परिचय करून दिला.
त्यानंतर ज्ञानदा यांनी माध्यमांच्या क्षेत्रात लागणारी विविध कौशल्ये व गुण यांची ओघवत्या शैलीत सविस्तर चर्चा केली. स्वतःच्या ११ वर्षांच्या एबीपी माझा येथील अनुभवाविषयी उदाहरणे देत विविध प्रकारची कामे, त्यासाठीची कौशल्ये आणि संभाव्य अडचणी याविषयी माहिती दिली. बातमीदाराच्या काही तासांच्या कष्टांना न्याय देणे आणि प्रेक्षकांना पडद्याशी खिळवून ठेवणे ही तारेवरची कसरत असते. तुमचा चेहरा हा त्या माध्यमाचा चेहरा असतो. प्रेक्षकांना केवळ तुमचा चेहरा आणि आवाज माहित असतो. तोच माध्यमाचा चेहरा असतो. विश्लेषण क्षमता, संशोधन वृत्ती, प्रसंगावधान या गोष्टी माध्यमात काम करताना उपयोगात येतात; याविषयी आपले विविध अनुभव त्यांनी कथन केले. रोजगार संधींविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, व्हिडिओ संपादन, प्रोग्रामिंग, निर्मिती, तंत्रज्ञान विभाग, छायाचित्रण विभाग यातील संधी आणि त्यासाठीची विशेष क्षमता यावर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. वासुदेव आठल्ये यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर विभागातील प्राध्यापकांनी सहकार्य केले.

Comments are closed.