गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी ध्वजारोहण सोहोळा संपन्न झाला. याप्रसंगी एन.सी.सी.च्या छात्रांनी शानदार संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली; या कार्यक्रमाचे संचलन लेफ्ट. प्रा. दिलीप सरदेसाई यांनी केले.
यानंतर राधाबाई शेट्ये हॉलमध्ये झालेल्या मुख्य कार्यक्रमात ‘मराठी भाषा पंधरवडा निमित्त भित्तीपत्रकाचे अनावरण व ग्रंथप्रदर्शनाचे ई उद्घाटन प्राचार्यांच्या हस्ते संपन्न झाले.’ सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या तीनही विभागांचे उपप्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या, शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.
याच कार्यक्रमामध्ये २०१९-२० यावर्षासाठीच्या आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. वरिष्ठ महाविद्यालयासाठी समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे, कनिष्ठ महाविद्यालयासाठी विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. चिंतामणी दामले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार लिपिक श्री. रोहन मुळ्ये यांना देण्यात आला. या सर्वांचे पुरस्कार देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. सुप्रिया टोळ्ये यांनी केले.