gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. रमेश कांबळे आणि श्रीमती सुनेत्रा हळबे सेवानिवृत्त

दि. ३० एप्रिल २०२० रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. रमेश कांबळे आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सेविका श्रीमती सुनेत्रा हळबे हे सेवानिवृत्त झाले.

डॉ. कांबळे यांनी महाविद्यालयात ३४ वर्षे सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करताना आपले वाचनातील वैविध्य आणि आसपास घडलेल्या जुन्या गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा सतत जागृत ठेवली. विद्यार्थ्यांना शिकवताना त्याचा जाणीवपूर्वक वापर केला व अत्यंत रोचक पद्धतीने इतिहास विषयाचे अध्यापक केले. त्यांनी एस.एन.डी.टी. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी क्रमिक पुस्तके, मराठी विश्वकोश आणि मराठी चरित्रकोशकरिता ४० पेक्षा जास्त नोंदी तसेच १० संशोधन प्रकल्पांचे लिखाण तसेच १० संशोधन प्रकल्पांचे लिखाण केले आहे. डायमंड प्रकाशन या पुणे येथील नामवंत प्रकाशन संस्थेने त्यांची ‘सावरकरांचे रत्नागिरीतील कार्य’, ‘मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजी आप्पांचे योगदान’ व ‘ऐतिहासिक शोधनिबंध’ अशी तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, इतिहास शिक्षण महामंडळ, मुंबई व कोकण इतिहास परिषद यांसारख्या नामवंत संस्थांनी त्यांच्या या संशोधन कार्याचा गौरव केला आहे. तसेच डॉ. कांबळे यांनी कला शाखेचे उपप्राचार्य आणि काही काळ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणूनही काम पाहिले आहे.

याप्रसंगी आपल्या सुरुवातीचा काळातील ज्येष्ठ प्राध्यापकांच्या आठवणी, नंतरच्या सर्व सहकाऱ्यांशी असलेले स्नेहाचे सबंध आठवताना ते भावूक झाले. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनीही डॉ. कांबळे यांच्याशी असलेल्या आपल्या मैत्रीचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, आमची कारकीर्द साधारण एकाच वेळी सुरु झाली. महाविद्यालयाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्यावर एकत्र केलेल्या कामाबरोबर मैत्रीचा घनिष्ठ सबंध निर्माण झाला आहे. यावेळी उपस्थित डॉ. कांबळे यांच्या पत्नी सौ. ज्योत्स्ना कांबळे यांचाही विशेष उल्लेख त्यांनी केला.

श्रीमती सुनेत्रा हळबे १९९८ पासून सुरुवातीच्या द्विलक्षी अभ्यासक्रम व त्यानंतर एम.सी.व्ही.सी. विभागात सेविका म्हणून कार्यरत होत्या. अत्यंत कष्टाने व कुटुंबातील अनेक कसोटीच्या प्रसंगांना तोंड देत आपल्या मनमिळाऊ व शांत स्वभावाला अनुसुसारून त्यांनी आपले काम केले. यावेळी अत्यंत मोकळेपणाने आपला खडतर प्रवास त्यांनी विषद केला व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले. यावेळी प्राचार्य म्हणाले की, हळबे बाईनी कोणतेही काम कधीही नकार ह देता अत्यंत आपलेपणाने केले. विशेषत: महाविद्यालयातील विद्यार्थिनीबाबत कोणतीही समस्या असली की हळबे बाई त्वरित तिथे पोहोचत असत; याचा उल्लेख केला.

सदर कार्यक्रमात र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, र. ए. सोसायटीला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रदीर्घ काल सेवा करणाऱ्या डॉ. कांबळे व श्रीमती हळबे यांच्यासारख्या सहकाऱ्यांच्या सेवाभावी कार्यामुळेच संस्थेची वाटचाल उत्तरोत्तर यशाकडे होत आहे. या दोनही व्यक्तींनी अनेक पातळ्यांवर आपापल्यामधील विशेष गुणांचा उपयोग महाविद्यालयाला करून दिला आहे. निवृत्ती हा आयुष्यातील केवळ एक टप्पा आहे. भावी आयुष्यात अशाच प्रकारे नवीन पिढीला घडवण्यात हे सहकारी आपले योगदान देतील अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

कार्याध्यक्षा व प्राचार्यांच्या हस्ते डॉ. कांबळे व श्रीमती हळबे यांचा सत्कार झाला व सर्वांनी त्यांना भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रा. महेश नाईक, प्रा. विशाखा संकपाळ आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. डॉ. मकरंद साखळकर यांनी आभारप्रदर्शन केले. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टेन्सिंगचा’ योग्य पद्धतीने अवलंब करून सदर कार्यक्रम संपन्न झाला.

Comments are closed.