दि. 30 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रशासकीय उपप्राचार्य डॉ प्रफुल्लदत्त कुलकर्णी आणि प्रयोगशाळा परिचर श्री संदेश ढवळे हे सेवानिवृत्त झाले.
डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी महाविद्यालयात 37 वर्षे प्राध्यापक म्हणून काम करताना आपले वाचनातील वैविध्य आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू ठेवले. रसायनशास्त्र विषय शिकवत असताना विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी सोप्या करून सांगणे, नवनवीन गोष्टींची ओळख करून देणे यामध्ये त्यांचा हातखंडा होता. महाविद्यालयामध्ये कार्यरत असताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना, मराठी विज्ञान परिषद यांचे समन्वयक अशा अनेक मोठ्या जबाबदाऱ्या लिहिलया पेलल्या. त्यांच्याच कार्यकाळामध्ये केलेल्या कार्यासाठी त्यांना ‘राष्ट्रीय सेवा योजनेसाठी असणारा बेस्ट प्रोग्राम ऑफिसरच्या’ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांना मुंबई विद्यापीठ, गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे ‘आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. तसेच लायन्स क्लब रत्नागिरी तर्फेही त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध प्रकाशित केले. डॉ. कुलकर्णी यांना इंडो नेपाल एकता पुरस्कार तसेच चतुरंग प्रतिष्ठान तर्फे ही पुरस्काराने गौरवण्यात आले. आपल्या कार्यकालात त्यांनी प्रशासकीय उपप्राचार्य तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्य केले.
याप्रसंगी आपल्या सुरुवातीचा काळातील ज्येष्ठ प्राध्यापकांच्या आठवणी, नंतरच्या सर्व सहकाऱ्यांशी असलेले स्नेहाचे सबंध आठवताना ते भावूक झाले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनीही त्यांच्याशी असलेल्या आपल्या मैत्रीचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, महाविद्यालयाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्यावर एकत्र केलेल्या कामाबरोबर मैत्रीचा घनिष्ठ सबंध निर्माण झाला आहे.
प्रयोगशाळा परिचर श्री. संदेश ढवळे यांनी प्रथम गोदुताई जांभेकर विद्यालयातून आपल्या कार्यकाला सुरुवात केली. त्यानंतर वसतीगृह, रसायनशास्त्र विभाग आणि वनस्पतीशास्त्र विभाग यामध्ये ते कार्यरत होते. अत्यंत कष्टाने आणि कुटुंबातील अनेक कसोटीच्या प्रसंगांना तोंड देत आपल्या शांत स्वभावाला अनुसरून त्यांनी आपले काम केले. त्यांच्याबद्दल बोलत असताना श्री गौतम शिंदे यांनी एकदा त्यांच्यावर जबाबदारी दिली की पुढे असणारे प्रयोग हे निश्चितपणे पार पडत या त्यांच्या विशेष गुणाबद्दल सांगितले.
सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दूदगीकर, माजी आमदार श्री बाळ माने यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना शिल्पाताई म्हणाल्या की, प्रदीर्घ काल सेवा करणाऱ्या डॉ. कुलकर्णी व श्री. ढवळे यांच्यासारख्या सहकाऱ्यांच्या सेवाभावी कार्यामुळेच संस्थेची वाटचाल उत्तरोत्तर यशाकडे होत आहे. या दोनही व्यक्तींनी अनेक पातळ्यांवर आपापल्यामधील विशेष गुणांचा उपयोग महाविद्यालयाला करून दिला आहे. निवृत्ती हा आयुष्यातील केवळ एक टप्पा आहे. भावी आयुष्यात अशाच प्रकारे नवीन पिढीला घडवण्यात हे सहकारी आपले योगदान देतील अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. कार्याध्यक्षा व प्राचार्यांच्या हस्ते डॉ. कुलकर्णी व श्री. ढवळे यांचा सत्कार झाला व सर्वांनी त्यांना भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी सरांचे माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांची प्रातिनिधिक मनोगते घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, विज्ञान शाखांचे विभागप्रमुख, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते. डॉ. मेघना म्हादये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.