रत्नागिरी : र. ए. सोसायटीच्या गोगटे – जोगळेकर महाविद्यालयातील प्रबंधक श्री. रवींद्र केतकर आणि प्रयोगशाळा परिचर श्री. दीपक कुळ्ये हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीपर सदिच्छा समारंभ महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला.
श्री. रवींद्र केतकर दि. १ जानेवारी, १९९० रोजी महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाले. आपल्या सेवेच्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, अधीक्षक, प्रबंधक अशा विविध जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडल्या. कार्यालयाप्रमाणे परीक्षा विभागातही त्यांनी उत्तम कार्य केले. नियुक्तीपासून प्रबंधक या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणारे श्री. केतकर हे महाविद्यालयाचे सहावे प्रबंधक आहेत.
श्री. दीपक कुळ्ये हे दि. १ ऑगस्ट, १९९७ रोजी महाविद्यालयात सेवक म्हणून रुजू झाले. तत्पूर्वी ते रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात कार्यरत होते. दि. १ डिसेंबर २०१२ रोजी ते प्रयोगशाळा परिचर झाले. महाविद्यालयाच्या जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विभागात त्यांनी प्रयोगशाळा परिचर म्हणून कामकाज पाहिले.
आपल्या सेवानिवृत्तीपर शुभेच्छा समारंभाच्या सत्काराला उत्तर देताना श्री. केतकर म्हणाले, विद्यार्थीदशेपासूनच माझा या संस्थेशी संबंध आला. तेव्हापासूनच माझे या संस्थेशी ऋणानुबंध जुळलेले आहेत. या संस्थेने मला सेवेची संधी दिली त्याबद्दल मी संस्था आणि महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी, तत्कालीन प्राचार्य आणि विद्यमान प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करतो. महाविद्यालयातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडूनही मला खूप आदर, प्रेम मिळाले, या सर्वांच्या सहकार्यामुळे मी काम करू शकलो. या सर्व प्रवासात माझी सहधर्मचारिणी सौ. सायली केतकर हिने आणि माझ्या कुटुंबीयांनीही मला मोलाची साथ दिली, असे सांगून त्यांनी महाविद्यालयाला भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री. केतकर यांचे कोणतेही काम अचूक आणि जबाबदारीने पार पाडण्याचे कौशल्य, मेहनतीने ते तडीस नेण्याची वृत्ती, विद्यापीठ आणि विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांशी असलेल्या दांडगा जनसंपर्क ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अन्य पैलू होय.
श्री. केतकर यांच्याप्रमाणेच श्री. कुळ्ये यांनीदेखील संस्था – महाविद्यालयातील प्रत्येक काम शांत आणि प्रामाणिकपणे पार पाडले.
याप्रसंगी र. ए. सोसायटीच्या वतीने प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या हस्ते, तर महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते दोन्ही सत्कारमूर्तींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, श्री. महेश सरदेसाई यांनी आपली मनोगते व्यक्त करून दोन्हीही सत्कारमूर्तीच्या गत आठवणीना उजाळा दिला आणि त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सुरुवातीच्या काळातील आठवणी सांगून श्री. केतकर आणि श्री. कुळ्ये यांच्या स्वभावातील विशेष गुणांचा उल्लेख केला. महाविद्यालयाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्याचे प्रबंधक केतकर साक्षीदार असल्याचे सांगून त्यांनी श्री. केतकर यांचा स्वभाव, कार्यातील गुणवैशिष्ट्ये अधोरेखित केली. तसेच दोन्ही सत्कारमूर्तींना चांगले आयुआरोग्य लाभावे, त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, सत्कारमूर्ती श्री. रवींद्र केतकर, श्री. दीपक कुळ्ये सपत्नीक उपस्थित होते.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. निलेश पाटील यांनी केले.