गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. स्वरदा उदय महाबळ हिने सन २०१८-१९ मध्ये झालेल्या पदवी परीक्षेत संस्कृत विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करत मुंबई विद्यापीठाचे संस्कृत विषयासाठी असलेले लक्ष्मीबाई द्वारकानाथ नाईक सुवर्णपदक संपादन केले आहे.
प्रथम वर्षापासून कु. स्वरदा हिने मुंबई विद्यापीठाची ‘ओ’ ग्रेड संपादित केली आहे. तृतीय वर्षी संस्कृत विषयात ८८.२५% गुण प्राप्त केले. यामुळे संस्कृत विषयासाठी असलेले सुवर्णपदक प्राप्त करण्याचा बहुमान तिला व गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त झाला. अभ्यासक्रमाबरोबरच विविध चर्चासत्रांमध्ये, संस्कृत स्पर्धा, विविध उपक्रमांमध्ये तिने सक्रीय सहभाग घेतला आहे. तसेच ती नृत्यविशारद असून तिला अभिनयाची आवड आहे; या सर्व गोष्टी सांभाळत तिने प्राप्त केलेले मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक ही विशेष बाब ठरते.
मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव, नोबेल पुरस्कार विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस, कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर,प्र. कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. सुनील भिरूड, परीक्षा संचालक डॉ. अर्जुन घाटूळे आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कु. स्वरदा हिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
या यशाबद्दल कु. स्वरदा हिचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीश शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखा उपप्राचार्या आणि संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. स्नेहा शिवलकर आणि इतर महाविद्यालयीन प्राध्यापक यांनी हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.