‘भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती’ अशी महती प्राप्त झालेल्या संस्कृत भाषेचा गौरव करण्यासाठी श्रावण पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला ‘संस्कृत दिन’ सर्वत्र साजरा केला जातो.
प्रतीवार्षाप्रमाणेच यावर्षीही गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाने नुकतेच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. दीपाली वैद्य यांची उपस्थिती होती. ‘संस्कृती: संस्कृताश्रिता’ या उक्तीची यतार्थता असणारे भाषण त्यांनी केले. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनात होणारा संस्कृतचा उपयोग या विषयाला अनुसरून त्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि प्रत्येक शाखेच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयाचा अभ्यास करावा असे आवाहनही केले. प्रारंभी काही मंगलपर श्लोकांवर आधारित असलेल्या नृत्याचे सादरीकरण कु. स्वरदा महाबळ हिने केले.
संस्कृत दिनाचे औचित्य साधून संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांनी काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामद्धे संस्कृत गीत, कथाकथन, संवाद आणि पथनाट्य इ. समावेश होता. या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्कृत भाषेचे असणारे महत्व यांवर प्रकाश टाकला. ‘चीनी वस्तूंचा होणारा अधिक उपयोग’ या विषयावर संस्कृतमधून सादर झालेले पथनाट्य हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. तसेच संस्कृत विभागातर्फे कालिदास व्याख्यान मालेप्रसंगी प्रतिवर्षी काही स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षीही अशा स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तर कु. तेजस्विनी करंबेळकर हिला सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात कु. प्राजक्ता मुसळे हिने ‘संस्कृतची थोडी ओळख व आजच्या आयुष्यातील तिचे स्थान’ या विषयावर पीपीटीद्वारा सादरीकरण केले.
कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या निमित्ताने ‘गीर्वाणकौमुदी’ या भित्तीपत्रकातील ‘कला’ या विषयावर संस्कृतच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या यावर्षीच्या दुसऱ्या अंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. किर्ती करकरे व कु. रुचा दळी यांनी केले. तर विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप कु. प्राजक्ता मुसळे हिने केलेल्या शांती मंत्र पठणाने झाला. या कार्यक्रमाला प्रा. जयंत अभ्यंकर आणि महाविद्यालयीन प्रध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.