गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाने रत्नागिरीकरांकरिता खास ‘संस्कृत संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्कृत नाटक तसेच गीत, नृत्य व संवादाने बहरलेला हा कार्यक्रम स्वा. सावरकर नाट्यगृहामध्ये नुकताच संपन्न झाला. यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, नाट्य दिग्दर्शक प्रा. विजयकुमार रानडे, लेखिका सौ. मालती हळबे, सह-दिग्दर्शक प्रा. जयंत अभ्यंकर आदि मान्यवर उपस्थित होते.
पद्मश्री पुरस्कार प्राप्त मा. चमूकृष्ण शास्त्री यांची ममता कवठेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा काही अंश कार्यक्रमाच्या प्रारंभी दाखविण्यात आला. संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली. स्वरदा महाबळ हिने ‘संघच्छावी वयं मिलित्वा’ या गाण्यावर नृत्य करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सहजसोप्या संस्कृत भाषेतील भाजी विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील संवाद विनिता मयेकर, धनश्री पाटील, वेदिका चव्हाण, शितल पाध्ये यांनी सादर केला. कार्यक्रमाचा उच्चबिंदू असणारे ‘उमायनम’ हे संस्कृत नाटक नंतर सदर झाले. त्यापूर्वी नाट्य दिग्दर्शक प्रा. विजयकुमार रानडे; लेखिका सौ. मालती हळबे; रंगावृत्ती लेखक तन्मय हर्डीकर; संगीत दिग्दर्शक गौरांग आगाशे, सायली मुळ्ये, प्रतिक जोशी, चैतन्य पटवर्धन; प्रकाश योजना करणारे अनिकेत चांदोरकर, चिन्मय जोशी; रंगभूषा करणारे लहू घाणेकर, अनिल सुवरे; वेशभूषा करणारे प्रतिमा खानोलकर, स्वरदा महाबळ; नैपथ्य सिद्धी वाडेकर, ओंकार कोकजे, जुई दाबके यांचा सत्कार करण्यात आला. या नाटकातील कलाकार सुश्रुत चितळे, हर्षदा मुसळे, ओंकार मुळ्ये, चेतना घाटे, प्राजक्ता मुसळे, शीतल पाध्ये, वसुमती करंदीकर, भार्गव वळंजू, सबा बंदरी, समीक्षा पवार यांना देखील भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्कृत विभागाच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
यानंतर ‘उमायनम’ या नाटकाला सुरवात झाली. क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणाऱ्या नाटकाला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सहजसोपी भाषा आणि जबरदस्त अभिनय हा या नाटकाचा विशेष ठरला. या नाटकाची निर्मिती व संकल्पना संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांची होती. जानेवारी महिन्यात पुणे येथे संपन्न झालेल्या हौशी संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत या नाटकाचा प्रयोग झाला होता. कालिदास स्मृति समारोहाचे कर्ते कै. भा. का. नेने यांची संस्कृत नाटक व्हावे हि इच्छा पूर्ण केल्याचे समाधान संस्कृत विभाग अनुभवत होता. तर नवीन काही पहिल्याचा आनंद रसिक प्रेक्षकांनी घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुई दाबके यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. जयंत अभ्यंकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये आणि प्रा. जयंत अभ्यंकर यांचे मार्गदर्शन लाभले.