स्वच्छता मोहीम योजनेअंतर्गत संपूर्ण देशातून ४००० शहरांची अधिकतम विकासासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामद्धे रत्नागिरी शहराचा समावेश आहे. त्यादृष्टीने रत्नागिरी शहरात या योजनेचा अधिक प्रसार व्हावा यासाठी रत्नागिरी नगर परिषेदेने पुढाकार घेऊन एक ‘स्वच्छता अॅप’ निर्माण केले आहे. त्यायोगे शहरातील विविध ठिकाणी आढळणाऱ्या ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे सुयोग्य पद्धतीने नियोजन व त्याची विल्हेवाट लावता येणे शक्य होणार आहे.
यासंदर्भात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी शहराचे नगराध्यक्ष श्री. राहुलजी पंडित यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला नुकतीच आवर्जून भेट दिली. आणि ‘स्वच्छता अॅप’चा मोठ्या प्रमाणात प्रसार व्हावा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. ‘स्वच्छता अॅप’विषयी अधिक माहिती देण्यासाठी नगर परिषदेचे अधिकारी श्री. घोरपडे, श्री. आरिफ शेख आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीश शेवडे यांची उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता अॅप’चा सुलभ वापर होण्याच्या दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी या अॅपचे डाऊनलोडिंग केले.
या कार्यक्रमाला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी आणि विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील तिनही शाखांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी या अॅपच्या माध्यमातून नोंदणी केली; अद्याप ही प्रक्रिया कार्यरत आहे.