जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, रिजनल सेंटर, बेळगाव आणि जीएसएस कॉलेज, बेळगाव यांच्या सहकार्याने ‘जागतिक पाणथळ दिवस’ या निमित्ताने दि. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र व भूगोल विभागातर्फे दक्षिण कोकणाच्या पाणथळ जमिनी या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, रिजनल सेंटर बेळगावचे अध्यक्ष डॉ. प्रमोद हणमगोंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सोनाली कदम, सागर वाघमारे (एस.पी.कन्सल्टन्सी), प्रा. योगेश सर (जीएसएस कॉलेज, बेळगाव-भूगर्भशास्त्र विभाग) तसेच इतर प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन झाले. प्रथम सत्रासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक डॉ. प्रमोद हणमगोंड यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. गेली अनेक वर्षे ते महाविद्यालयाशी नॅक, सामंजस्य करार व विविध उपक्रमांच्या माध्यमातून जोडलेले आहेत.
चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात डॉ. प्रमोद हणमगोंड यांनी दक्षिण कोकणाच्या पाणथळ जमिनी या विषयावर पाणथळ जमिनीची वैशिष्ट्ये, त्यांच्यावर परिणाम करणारे विविध घटक, विविध रामसर साईट, फायदे, आव्हाने आणि त्यांच्या संवर्धनातील आपले योगदान या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात वनस्पतीशास्त्र विभागाचे जेष्ठ प्राध्यापक प्रा. शरद आपटे यांनी पाणथळ जागांवरील वनस्पतींची माहिती त्यांचे फोटो, स्थानिक उपयोग व वैशिष्ट्यांसह प्रभावीपणे करून दिली. जेवणानंतरच्या तिसऱ्या सत्रात मत्स्य महाविद्यालय रत्नागिरीतील डॉ. मिलिंद सावंत यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी परिस्थितीकीय अभियांत्रिकी व कांदळवन संवर्धन या विषयावरील विविध शास्त्रीय पद्धती व त्यांनी केलेल्या कामाची माहिती उपस्थितांना करून दिली. चर्चासत्राच्या चौथ्या आणि शेवटच्या सत्रात पर्यावरण दक्षता मंच, ठाणे यांचे अध्यक्ष डॉ. प्रसाद कर्णिक यांचे मार्गदर्शन उपस्थितांना ऑनलाइन पद्धतीने लाभले. त्यांनी ठाणे खाडीसाठीच्या पाणथळ जमिनीचे संवर्धन आणि व्यवस्थापनाच्या यशस्वी कार्याचा आढावा घेतला. त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या चर्चासत्रासाठी विविध संस्थांमधून संशोधक विद्यार्थी व महाविद्यालयाचे ६५ विद्यार्थी सहभागी झाले वनस्पतीशास्त्र, भूगोल व ग्रामीण विकास विभागाचे ८ प्राध्यापक यात सहभागी झाले. हे चर्चासत्र जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, रिजनल सेंटर बेळगाव यांच्याकडून प्रायोजित करण्यात आले. यामुळेच संपूर्ण चर्चासत्र निशुल्क स्वरूपात सर्व अभ्यासकांना व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता आले. या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉ. विराज चाबके, प्रा. गोडबोले, प्रा. गुरव, प्रा. शिंदे- अवेरे, प्रा. गावडे, प्रा. विभुते तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.