gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘पदवी काळात यूपीएससी/एमपीएससी स्पर्धा परीक्षा तयारी कशी करावी’ याविषयी वेबीनार संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे कै. बाबुराव जोशी ग्रंथालय आणि द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पदवी काळात यूपीएससी/एमपीएससी स्पर्धा परीक्षा तयारी कशी करावी’ या विषयावरील वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. सदर वेबीनार दि. २६ ऑगस्ट रोजी संपन्न झाला. वेबीनारला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. हर्षल लवंगारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभागाचा आढावा घेतला आणि महाविद्यालयीन ग्रंथालयाविषयी उपयुक्त माहिती दिली.

द युनिक अकॅडमीचे श्री. चंद्रकांत खराटे यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली. कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी स्पर्धा परीक्षेच्या युगात अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांना अधिक प्रेरित करतील असा आशावाद व्यक्त केला.

पदवी काळात स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन करताना प्रा. हर्षल लवंगारे यांनी परीक्षेचे विविध टप्पे, अभ्यासक्रम, परीक्षेला सामोरे जाताना आवश्यक असलेली मानसिकता, सकारात्मक दृष्टीकोन, मुलाखत तंत्र, सुरुवातीपासून अभ्यास कसा करावा, महाविद्यालयीन जीवन आणि परीक्षा अशा विविध महत्वाच्या घटकांची सविस्तर अशी माहिती दिली. वेबीनारप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

महाविद्यालयाच्या सर्व शाखांतील विद्यार्थ्यांनी सदर वेबीनारला आपली उपस्थिती ठेऊन त्यांना असलेल्या विविध शंकांबाबत मार्गदर्शन तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्राप्त करून घेतले. सदर वेबिनारच्या आयोजनाविषयी प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

Comments are closed.