gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सोनल कांबळे हिला मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक

Secured Gold Medal

मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या एम. ए. परीक्षेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाची कु. सोनल मिलिंद कांबळे हिने विद्यापीठात सर्वप्रथम येऊन काशिनाथ त्र्यंबक तेलंग सुवर्णपदक प्राप्त केले आहे. कु. सोनल महाविद्यालयाच्या प्रथम वर्षापासून समाजशास्त्र विभागाची विद्यार्थिनी असून तिने विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयाला यश मिळवून दिले आहे. मुंबई विद्यापीठ येथे झालेल्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि कुलपती मान. सी विद्यासागर राव, कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्रमुख अतिथी नोबेल पुरस्कार विजेते सर रिचर्ड रॉबर्टस यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले.

महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागात तिने कार्य केले असून अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी केलेल्या समाजप्रबोधनात्मक पथनाट्यातून तिने समाजकार्य केले आहे. सामाजिक संशोधनाची आवड असणारी कु. सोनल विविध निबंध स्पर्धांची विजेती आहे. कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.

महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाचे आजपर्यंत १० विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. विभागातील विद्यार्थ्यांनी सेट आणि नेट परीक्षेतही सातत्याने सुयश प्राप्त केले आहे.

सोनल कांबळे हिच्या दैदिप्यमान यशावर भाष्य करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले की, ‘समाजशास्त्र विभागाला आदर्श परंपरा असून या परंपरेनुसार सोनलने संपादित केलेले यश ठळकपणे अधोरेखित करण्याजोगे आहे. केवळ बौद्धिक क्षेत्रात नव्हे तर विविध सामाजिक उपक्रमामध्ये आणि स्पर्धामध्ये तिने प्राप्त केलेले यश प्रेरणादायी आहे.’ असे विचार व्यक्त करून तिचे व समाजशास्त्र विभागाचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे यांनी माहिती देताना सांगितले की, ‘कै. संजय जोशी यांच्या अथक प्रयत्नांतून २००४ साली सुरु झालेल्या समाजशास्त्र विभागाने गेल्या चौदा वर्षात दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. मुंबई बाहेर एखाद्या महाविद्यालयातून एका विषयात दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणे हे कै. संजय जोशी यांच्या प्रेरणेमुळेच शक्य झाले आहे; अशी कृतज्ञता व्यक्त करून हे यश त्यांनाच समर्पित केले आहे. या यशात विभागातील सर्व प्रध्यापाकांबरोबरच प्रा. सचिन सनगरे यांनी केलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.’

सुवर्णपदक विजेत्या कु. सोनलचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तीनही विभागांचे उपप्राचार्य आणि प्राध्यापक यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

sonal milind kamble
Comments are closed.