गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप’ या युवा सांस्कृतिक महोत्सवात गीत गायन स्पर्धेने जबरदस्त माहोल निर्माण केला. सहभागी विद्यार्थ्यांनी भक्तीगीत, कोळीगीत, कोकणी गीत, लावणी गीत या गायन प्रकारातील लोकप्रिय अशी सुमधुर गीते सदर करून उपस्थित युवकांना आपल्या तालावर नाचवले.
सदर स्पर्धेत द्वंद्व गीतमध्ये वेदिका आगाशे आणि नेत्रा सप्रे यांनी प्रथम क्रमांक, प्रनेत्री पांचाळ आणि श्रेयस बाईत यांनी द्वितीय क्रमांक जिंकून बाजी मारली. वैयक्तिक गायन प्रकारात अनुष्का देवरुखकर प्रथम, सायली मुळे द्वितीय तर प्रनेत्री पांचाळ हिने तृतीय क्रमांक पटकावला. दिपाली पेडमकर आणि नेहा शर्मा यांना अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचे परीक्षण गुरुदेव नांदगावकर आणि कश्मिरा सावंत यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप दोन्ही परीक्षकांच्या सुरेल गाण्यांच्या सादरीकरणाने संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तीनही विभागांचे उपप्राचार्य, झेपचे समन्वयक प्रा. आनंद आंबेकर, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.