अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. चंद्रकांत घवाळी यांना महाविद्यालयातील प्रदीर्घ सेवेनंतर समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य, डॉ. किशोर सुखटणकर, प्रशाकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, गणित विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. विशाखा सकपाळ, क्रीडा विभागातील सौ. लीना घाडीगावकर, प्रबंधक श्री. मोहन कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयात १९८६ पासून कार्यरत असलेले प्रा. घवाळी या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी विद्यार्थीदशेत एन.सी.सी. तसेच विद्यापीठ स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त केले होते. एन.सी.सी.मध्ये त्यांनी सुवर्ण पदकासह शिष्यवृत्ती प्राप्त केली होती. खो-खोमध्ये राष्ट्रीय स्तरावर, कबड्डीमध्ये राज्य स्तरावर तर अॅथलेटीक्समध्ये विद्यापीठ स्तरावर उल्लेखनिय कामगिरी केली आहे. महाविद्यालयातील ३२ वर्षांच्या सेवेच्या काळात त्यांनी खो-खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल आणि अॅथलेटीक्समध्ये अनेक नैपुण्य प्राप्त करणारे विद्यार्थी घडवले आहेत.
त्यांच्या सत्कार समारंभानंतर बोलताना प्राचार्य, डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले, प्रा. घवाळी यांचा प्रेमळ स्वभाव, कामातील नेमकेपणा, कोणत्याही कामात झोकून घेण्याची सवय आणि उत्साह हे गुण अनुकरणीय आहेत. महाविद्यालयाला भविष्यात त्यांची गरज लागणार असून ते आम्हाला निश्चितच सहकार्य करतील असा विश्वास वाटतो असे सांगून त्यांचे भावी आयुष्य सुखी व समाधानाने व्यथित व्हावे म्हणून शुभेच्छा व्यक्त केल्या.