महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये वैज्ञानिक प्रतिभा आणि संशोधनवृत्ती वृद्धींगत व्हावी यासाठी राज्य पातळीवर अविष्कार संशोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. मुंबई विद्यापीठाअंतर्गत अविष्कार संधोधन मेळावा रत्नागिरी जिल्हा विभागीय फेरीचे आयोजन देवरुख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात करण्यात आले होते. या विभागीय फेरीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले नैपुण्य दाखवून उत्तुंग यश संपादन केले.
या विभागीय फेरीत महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या ३१ संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. यातील १५ संशोधन प्रकल्पांची मुंबई विद्यापीठामद्धे होणाऱ्या अविष्कार संधोधन मेळाव्याच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली. कला शाखेतून दोन, वाणिज्य शाखेतून पाच आणि विज्ञान शाखेतील आठ प्रकल्पांची निवड अंतिम फेरीसाठी झाली. संशोधन विद्यार्थी गटातून श्री. अजिंक्य पिलणकर आणि कु. मीनल खांडके (वाणिज्य शाखा), संशोधन शिक्षक गटातून प्रा. विवेक भिडे (विज्ञान शाखा) यांच्या संधोधन प्रकल्पांची अंतिम फेरीकरिता निवड करण्यात आली.
अंतिम निवड फेरीकरिता पात्र ठरलेले आणि सहभागी झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अभिनंदन केले आहे. या स्पर्धेकरिता प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, शोधवेध व अविष्कार समिती समन्वयक डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.