gogate-college-autonomous-updated-logo

‘स्त्रियांनी आपल्यातील ‘स्व’चा शोध घेऊन वाटचाल करावी’- सुमित्राताई महाजन ; सुमित्राताई महाजन यांनी उलगडला आपला राजकीय प्रवास

Sumitrabai Mahajan

रत्नागिरी : प्रत्येक स्त्रीमध्ये एक सुप्त शक्ती, गुण दडलेला असतो, आपल्यातील ‘स्व’ चा शोध घेऊन आपण आपल्या भावी आयुष्यात वाटचाल केली पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्याला नको असलेल्या, न आवडणाऱ्या गोष्टी आपण देऊन टाकतो, परंतु आपल्याला आवडणारी, हवीहवीशी वाटणारी गोष्ट आपण समाजाला दिली पाहिजे. देशाला प्रगतीपथावर नेण्यात कुटुंबातील एका स्त्रीचे योगदानदेखील महत्वाचे असते, असे प्रतिपादन माजी लोकसभा सभापती सुमित्राताई महाजन यांनी येथे केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या वतीने सुमित्राताई महाजन यांच्याशी मुलाखतपर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संवादिका प्रा. डॉ. निधी पटवर्धन यांनी त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या संवादातून सुमित्राताई महाजन यांनी आपले बालपण ते लोकसभा सभापती पदापर्यंतचा राजकीय प्रवास उलगडून दाखवला. आयुष्यात घडलेल्या विविध घटना, त्यातून मिळालेली कलाटणी, शिक्षण, राजकीय कारकीर्द अशा व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील अनेक आठवणीना त्यांनी उजाळा दिला. चिपळूणसारख्या गावात गेलेले बालपण, तत्कालीन शिक्षण पद्धती, घरातील मनमोकळे वातवरण, आईच्या निधनानंतर मुंबईत पुढील शिक्षण घेताना आलेल्या अडचणी, त्यावर खंबीरपणे केलेली मात, विवाहप्रसंगीचे क्षण अशा विविध पैलूंवर त्यांनी दिलखुलास गप्पांमधून प्रकाश टाकला.

राजकारणातील कार्याचा आढावा घेताना आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भगिनी मंडळ आणि राष्ट्र सेविका समिती यांच्या माध्यमातून झाली. आणीबाणीच्या काळात खऱ्या अर्थाने आपल्या कारकीर्दीला सुरुवात झाली. सुरुवातीला तुरुंगातील व्यक्तींच्या घरी भेटी देऊन कुटुंबीय आणि घरातील महिलांना दिलासा देणे, पक्षाच्यामार्फत आलेली आर्थिक मदत कुटुंबांपर्यंत पोहोचवणे, तुरुंगात असलेल्या व्यक्तींसाठी पॅरोल मिळवणे, अशी कामे केली. आपण सलग आठ वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून आल्याचे सांगून त्यासाठी एकही पैसा न देता माणसे जोडून कसे प्रयत्न केले, हेही त्यांनी नमूद केले. महिलांना राजकारणात काम करण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा फार महत्त्वाचा असतो, असे सांगून आपल्या सासूबाईंचे योगदान फार मोलाचे आहे, शिक्षण आणि सामाजिक कार्य करत असताना पाठिंबा त्यांनी दिलाच; परंतु अनेक बारीकसारीक गोष्टीबद्दलही मार्गदर्शन केले. एक स्त्री उत्तम प्रशासक म्हणून कशी भूमिका बजाऊ शकते, हे सभापतीपदी काम करताना शिकता आले असल्याचे सांगून सभापतीपदी काम करत असताना त्यांनी राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. आपण उत्तम शिक्षक कसे व्हावे? आपल्या विद्यार्थ्यांचे केवळ विषयाबद्दलचे ज्ञान वाढवण्यापुरते मर्यादित न राहता त्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित महिला शिक्षकांना केले.

आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, माणूस माणसाला जोडत गेला की कार्य मोठे होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुमित्राताई. सुमित्राताईंच्या कामाची व्याप्ती विशद करून त्यांनी आजच्या संवादपर कार्यक्रमातून मिळालेल्या प्रेरणेतून संस्थेच्या शाळा- महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षिका निश्चितच वाटचाल करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमास तिन्ही शाखेच्या उपप्राचार्या, महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ. सोनाली कदम आदींसह र. ए. संस्थेच्या सर्व शाळा, गोगटे – जोगळेकर महाविद्यालयातील महिला विभागप्रमुख, प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Sumitrabai Mahajan
Comments are closed.